उत्प. 20

20
अब्राहाम आणि अबीमलेख
उत्प. 12:10-20; 26:1-11
1अब्राहाम तेथून नेगेबकडे प्रवास करीत आणि कादेश व शूर यांच्यामध्ये राहिला. तो गरारात परदेशी मनुष्य म्हणून राहिला होता. 2अब्राहाम आपली पत्नी सारा हिच्याविषयी म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” गराराचा राजा अबीमलेखाने आपली माणसे पाठवली आणि ते सारेला घेऊन गेले. 3परंतु देव रात्री अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “पाहा जी स्त्री तू घेऊन आलास तिच्यामुळे तू मेलाच म्हणून असे समज, कारण ती एका मनुष्याची पत्नी आहे.” 4परंतु अबीमलेख तिच्याजवळ गेला नव्हता. तो म्हणाला, “प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही नाश करणार काय? 5‘ती माझी बहीण आहे,’ असे तो स्वतःच मला म्हणाला नाही काय? आणि ‘तो माझा भाऊ आहे,’ असे तिनेही म्हटले. मी आपल्या अंतःकरणाच्या शुद्धपणाने आणि आपल्या हाताच्या निर्दोषतेने हे केले आहे.” 6मग देव त्यास स्वप्नात म्हणाला, “होय! तू आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेने हे केले आहेस हे मला माहीत आहे, आणि तू माझ्याविरूद्ध पाप करू नये म्हणून मी तुला आवरले. मीच तुला तिला स्पर्श करू दिला नाही. 7म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.” 8अबीमलेख सकाळीच लवकर उठला आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना स्वतःकडे बोलावले. त्याने सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या तेव्हा ती माणसे फारच घाबरली. 9मग अबीमलेखाने अब्राहामास बोलावून त्यास म्हटले, “तू हे आम्हांला काय केले? मी तुझ्याविरूद्ध काय पाप केले की तू माझ्यावर आणि माझ्या राष्ट्रावर असे मोठे पाप आणले? तू माझ्याशी करू नये ते केले आहे अशा गोष्टी तू करायच्या नव्हत्या.” 10अबीमलेख अब्राहामाला म्हणाला, “तुला हे करण्यास कोणी सुचवले?” 11अब्राहाम म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय खात्रीने नाही, म्हणून ते माझ्या पत्नीकरीता मला ठार मारतील, असा विचार मी केला. 12शिवाय ती खरोखर माझी बहीण आहे. ती माझ्या बापाची मुलगी आहे, पण माझ्या आईची ती मुलगी नाही आणि म्हणून ती माझी पत्नी झाली आहे. 13देवाने मला माझ्या बापाचे घर सोडून देऊन जागोजागी प्रवास करायला लावले, तेव्हा मी तिला म्हणालो, तू माझी पत्नी म्हणून मला एवढा विश्वासूपणा दाखव; जेथे जेथे आपण जाऊ तेथे तेथे माझ्याविषयी हा, ‘माझा भाऊ आहे असे सांग.’” 14अबीमलेखाने अब्राहामाला सारा परत दिली; तसेच त्याने त्यास मेंढरे, बैल व दास-दासीही दिल्या. 15अबीमलेख म्हणाला, “पाहा, माझा हा सर्व देश तुझ्यासमोर आहे; तुला बरे वाटेल तेथे तू राहा.” 16तो सारेला म्हणाला, “तुझा भाऊ अब्राहाम याला मी चांदीची एक हजार नाणी दिली आहेत. तुझ्यासोबत असलेल्या सर्व लोकांसमोर तुझी भरपाई करण्यासाठी ते आहेत, आणि या प्रकारे तू सर्वांसमोर पूर्णपणे निर्दोष ठरली आहेस.” 17अब्राहामाने देवाची प्रार्थना केली आणि देवाने अबीमलेख, त्याची पत्नी आणि त्याच्या दासी यांना बरे केले. मग त्यांना मुले होऊ लागली. 18कारण परमेश्वराने अब्राहामाची पत्नी सारा हिच्यामुळे अबीमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांची गर्भाशये अगदी बंद केली होती.

المحددات الحالية:

उत्प. 20: IRVMar

تمييز النص

شارك

نسخ

None

هل تريد حفظ أبرز أعمالك على جميع أجهزتك؟ قم بالتسجيل أو تسجيل الدخول