YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 24

24
फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशी
1पाच दिवसांनंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील ह्यांना घेऊन खाली आला; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
2त्याला बोलावल्यावर तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो येणेप्रमाणे :
“फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत;
3म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो.
4तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहेरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे.
5हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हांला आढळून आले आहे, आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
6ह्याने मंदिरही विटाळवण्याचा प्रयत्न केला; त्याला आम्ही धरले; [व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो;
7पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातांतून काढून नेले.
8आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली;] ह्याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
9तेव्हा ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहूद्यांनीही दुजोरा दिला.
10मग सुभेदाराने बोलण्यास खुणावल्यावर पौलाने उत्तर दिले :
“आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो.
11आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेमेत उपासना करायला जाऊन अजून बारांपेक्षा अधिक दिवस झाले नाहीत;
12आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजवताना मी त्यांना आढळलो नाही.
13ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत.
14तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो;
15आणि [मृत झालेल्या] नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो.
16ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
17मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.
18हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते;
19त्यांचे माझ्याविरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता;
20किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे.
21त्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे,’ हे शब्द मी मोठ्याने बोललो; हा एवढा उद्‍गार अपराध असला तर असेल.”
फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो
22फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.”
23आणि त्याने शताधिपतीला हुकूम केला की, “ह्याला पहार्‍यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.”
24मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले.
25तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
26आणखी आपणास पौलाला सोडण्यासाठी त्याच्याकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
27पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in