YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 8

8
1ज्ञानी पुरुषासमान कोण आहे? कोणत्याही गोष्टीचा उलगडा करण्याचे कोणाला समजते? ज्ञान मनुष्याचे मुख तेजस्वी करते; तेणेकरून त्याच्या मुखाचा उद्धटपणा पालटतो.
राजाच्या आज्ञा पाळ
2मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ.
3त्याला सोडून जाण्याची घाई करू नकोस; दुष्ट मसलतीत शिरू नकोस; कारण त्याला आवडेल ते तो करतो,
4राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल?
5जो आज्ञा पाळतो तो अनिष्ट पाहणार नाही; नेमलेला काळ व न्यायसमय हे ज्ञान्याच्या मनाला अवगत होतील.
देवाचे मार्ग मानवी ज्ञानाला अगम्य
6प्रत्येक गोष्टीला नेमलेला काळ व न्यायसमय असतो, कारण मनुष्याची भयंकर दुर्दशा होते.
7पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल?
8प्राणावर कोणा मनुष्याची अशी सत्ता नसते की तो त्याला जाऊ देणार नाही; मरणदिवस कोणाच्या स्वाधीन नाही; हा संग्राम कोणाला सुटणार नाही. दुष्कर्म आपल्या मालकाचा बचाव करीत नाही.
9हे सर्व मी पाहिले आहे; भूतलावर चालू असलेल्या सर्व कृत्यांकडे मी आपले चित्त लावले आहे; एक मनुष्य दुसर्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करतो.
10त्या वेळी माझ्या नजरेस असे आले की दुष्टांना मूठमाती मिळून ते विराम पावतात; नीतीने वागणार्‍यांना पवित्रस्थान सोडून जावे लागते, आणि नगरातील लोक त्यांना विसरून जातात; हेही व्यर्थ.
11दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.
12पापी शंभरदा पाप करून पुष्कळ दिवस वाचला तरी माझी खातरी आहे की देवाचे भय बाळगणारे जे त्याला भिऊन वागतात त्यांचे कल्याणच होईल;
13पण दुष्टाचे कल्याण होणार नाही, व त्याचे छायारूप आयुष्य दीर्घ असणार नाही; कारण तो देवाला भिऊन वागत नाही.
14पृथ्वीवर आणखी एक व्यर्थ गोष्ट घडते : असे काही नीतिमान लोक असतात की दुष्टांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; आणि असे काही दुर्जन असतात की नीतिमानांच्या करणीमुळे त्यांची जी स्थिती व्हावी ती ह्यांची होते; हेही व्यर्थ! असे मी म्हटले.
15मग मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी ह्यांपेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला ह्या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यात श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.
16मग ज्ञानाची ओळख करून घेण्याकडे व पृथ्वीवर चालू असलेला उद्योग पाहण्याकडे मी आपले चित्त लावले; कारण अहोरात्र ज्यांचा डोळ्यास डोळा लागत नाही असेही लोक असतात.
17मग मी देवाच्या सर्व कार्याकडे लक्ष दिले, तेव्हा असे दिसून आले की भूतलावर जे काही कार्य चालले आहे ते मनुष्याला कळत नाही; शिवाय मनुष्याने परिश्रम करून त्याचा शोध केला तरी त्याचा थांग लागत नाही; ज्ञानी पुरुष म्हणेल की मी ते शोधून काढीन; तर त्यालाही त्याचा थांग लागायचा नाही.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in