YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस पत्र 5

5
1तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.
2आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
3परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.
4तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो.
5जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात.
6पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो.
7म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका;
8कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;
9(कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.)
10प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा.
11अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;
12कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे.
13सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे.
14म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून
ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2
15म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.
16वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत.
17म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.
18द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;
19स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;
20आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकारस्तुती करत जा.
21ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.
ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम
22स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा.
23कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे.
24तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे.
25पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले,
26अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,
27आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.
28त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो.
29कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो.
30कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे आहोत] आहोत.
31“म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.”
32हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.
33तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in