YouVersion Logo
Search Icon

ईयोब 29

29
ईयोब आपले पूर्वीचे सुख आठवतो
1ईयोब आपला वाद पुढे चालवून म्हणाला,
2“पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.
3त्याचा दीप माझ्या शिरावर प्रकाशत असे; व त्याच्या तेजाने मी अंधकारात चालत असे;
4त्या काळी मी भर उमेदीत होतो; देवाचा सहवास मला माझ्या डेर्‍यात घडे;
5सर्वसमर्थ त्या काळी माझ्यासन्निध असे; माझी मुलेबाळे माझ्या सभोवती असत;
6दह्यालोण्यात माझी पावले भिजत; खडकातून तेलाचे प्रवाह माझ्यासाठी निघत.
7मी नगराच्या वेशीनजीक जाऊन, चौकात माझे आसन मांडी,
8तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत;
9सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत;
10अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही.
11कोणाच्या कानी माझे वर्तमान गेले असता तो मला धन्य म्हणे; कोणाच्या दृष्टीस मी पडलो असता तो माझ्याविषयी ग्वाही देई;
12कारण करुणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित ह्यांचा मी उद्धार करी.
13नाश होण्याच्या लागास आलेल्याचा मी आशीर्वाद घेई; विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गायला लावी.
14नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे.
15मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई.
16मी लाचारांचा पिता असे; अपरिचितांच्या फिर्यादीची मी दाद घेई.
17मी दुष्टांचे दात पाडी, त्याच्या दातांतून शिकार सोडवी.
18तेव्हा मी म्हणे की, ‘माझ्या घरकुलातच राहून मला मरण येईल, व माझे दिवस वाळूच्या कणांप्रमाणे1 बहुगुणित होतील;
19माझे मूळ पाण्याजवळ पसरेल; माझ्या फांदीवर रात्रभर दहिवर राहील.
20माझे वैभव माझ्या ठायी जसेच्या तसेच टवटवीत राहील;’ माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील.’
21लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकायला ते स्तब्ध राहत.
22माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.
23लोक माझ्या बोलण्याची पावसाप्रमाणे वाट पाहत; जसे काय अखेरच्या पावसासाठी तोंड पसरून ते अपेक्षा करीत.
24ते निराश झाले असता मी त्यांच्याकडे हास्यवदन करून पाही; त्यांना माझे मुखतेज उतरवता येत नसे.
25मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे; सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तांत जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे.”

Currently Selected:

ईयोब 29: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in