YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 10

10
1मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दु:खी.
2दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.
3परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.
4सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.
5उन्हाळ्यात जमवाजमव करतो तो मुलगा शहाणा होय; जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय.
6नीतिमानाच्या मस्तकी आशीर्वाद असतात; दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते.
7नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.
8सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.
9सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.
10जो डोळे मिचकावतो तो दु:खास कारण होतो; वाचाळ मूर्ख अध:पात पावतो.
11नीतिमानाचे मुख जीवनाचा झरा आहे; दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते.
12द्वेष कलह उत्पन्न करतो; प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
13विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.
14शहाणे जन ज्ञानसंग्रह करतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय.
15धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे.
16नीतिमानाचा उद्योग जीवनप्रद आहे. दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते.
17बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो.
18गुप्तपणे द्वेष करणार्‍याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो.
19फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.
20नीतिमानाची जिव्हा उत्कृष्ट रुप्यासारखी आहे; दुर्जनांचे हृदय कवडीमोल आहे.
21नीतिमानाची वाणी बहुतांचे पोषण करते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात.
22परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.
23मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते.
24दुर्जन ज्याला भितो ते त्याच्यावर येईल, आणि नीतिमानाची इच्छा पूर्ण होते.
25वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्‍या पायासारखा आहे.
26जशी आंब दातांना, जसा धूर डोळ्यांना, तसा आळशी मनुष्य त्याला पाठवणार्‍यांना आहे.
27परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.
28नीतिमानाची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.
29परमेश्वराचा मार्ग सात्त्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणार्‍यांना तो नाशकारक आहे,
30नीतिमान कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत.
31नीतिमानाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल.
32नीतिमानाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in