YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 15

15
1मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.
2सुज्ञाची जिव्हा सुज्ञान वदते; मूर्खाच्या मुखातून मूर्खता बाहेर पडते.
3परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.
4जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते.
5मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो; वाग्दंड लक्षात ठेवतो तो शहाणा होतो.
6नीतिमानाच्या गृहात मोठे भांडार असते; दुर्जनांच्या मिळकतीत उपद्रव असतो.
7ज्ञान्यांची वाणी विद्येचा प्रसार करते; मूर्खांचे हृदय स्थिर नसते.
8दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.
9दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.
10जो सन्मार्ग सोडतो त्याला भारी शासन होते; जो वाग्दंडाचा तिटकारा करतो तो मरेल.
11अधोलोक आणि विनाशस्थान1 ही परमेश्वराच्या दृष्टीपुढे आहेत; तर मग मनुष्यजातीची अंत:करणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत! 12निंदकाला वाग्दंड आवडत नाही; तो ज्ञान्यांकडे जात नाही;
13आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते.
14बुद्धिमानाचे मन ज्ञानाचा शोध करते; मूर्खाचे मुख मूर्खता भक्षते;
15दु:खग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात, पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा मेजवानी असते.
16बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे;
17पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे, ह्यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी.
18तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो;
19आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी असते, पण सरळांची वाट राजमार्ग बनते.
20शहाणा मुलगा बापाला आनंद देतो; मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो;
21बुद्धिहीन इसम मूर्खपणात आनंद मानतो. समंजस मनुष्य सरळ मार्गाने जातो.
22मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.
23मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!
24सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.
25परमेश्वर गर्विष्ठाचे घर जमीनदोस्त करतो, पण विधवेची मेर कायम राखतो.
26परमेश्वराला दुष्ट कल्पनांचा वीट आहे, पण ममतेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत.
27धनलोभी आपल्या कुटुंबाला त्रास देतो, पण ज्याला लाचेचा तिटकारा असतो तो वाचतो.
28नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.
29परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.
30नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.
31जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञान्यांमध्ये वस्ती करतो.
32जो शिक्षण अव्हेरतो तो आपल्या जिवाला तुच्छ लेखतो; जो वाग्दंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो.
33परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in