YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 21

21
1राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.
2मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
3नीतिमत्तेने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
4चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.
5उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
6असत्य जिव्हेने मिळवलेले धन इकडेतिकडे उडून जाणार्‍या वाफेसारखे आहे; मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.
7दुर्जनांचा बलात्कार त्यांना उडवून टाकील. कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात.
8अपराधांचा भार वाहणार्‍याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते.
9भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा, धाब्याच्या एका कोपर्‍याला बसणे पुरवले.
10दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजार्‍यावर तो कृपादृष्टी करीत नाही.
11निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो; सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो.
12न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तींत पाडतो.
13गरिबाची आरोळी ऐकून जो कानांत बोटे घालतो तोही आरोळी करील पण कोणी ऐकणार नाही.
14एकान्ती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते.
15न्याय झाल्याने नीतिमानाला आनंद होतो, पण दुष्कर्म करणार्‍यांचा त्यामुळे नाश होतो.
16ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल.
17ज्याला ख्यालीखुशाली आवडते तो दरिद्री होतो; ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शौक आहे तो धनवान होत नाही.
18नीतिमानाची खंडणी दुर्जन, आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.
19भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला.
20सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल ह्यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवतो.
21जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.
22सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.
23जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.
24गर्विष्ठ व चढेल मनुष्याला ‘उद्दाम’ म्हणतात, तो गर्वाच्या ताठ्याने वागतो.
25आळश्याची वासना त्याला मारून टाकते; कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात.
26कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;
27दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?
28खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही.
29दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करतो.
30परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.
31लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करतात, पण यश देणे परमेश्वराकडे असते.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in