YouVersion Logo
Search Icon

प्रकटी 15

15
सात वाट्या आणि पीडा
1नंतर मी अत्यंत आश्‍चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले; ‘सात पीडा’ घेतलेले सात देवदूत दृष्टीस पडले; त्या पीडा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला.
2मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले; श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.
3‘ते देवाचा दास मोशे ह्याचे गीत,’ व ‘कोकर्‍याचे गीत’ गाताना म्हणतात,
“हे ‘प्रभू’ देवा, हे सर्वसमर्था,
‘तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत;’
‘हे राष्ट्राधिपते,’ ‘तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत.’
4‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही?
तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’
कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस;
आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून
‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’
5नंतर मी पाहिले, तेव्हा ‘साक्षीच्या मंडपाचे’ ‘स्वर्गातील मंदिर’ उघडले;
6आणि स्वच्छ व तेजस्वी ‘तागाची वस्त्रे परिधान केलेले’ व छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेले असे, ‘सात पीडा’ घेतलेले ते सात देवदूत त्या मंदिरातून निघाले.
7त्या चार प्राण्यांपैकी एकाने युगानुयुग जिवंत असणार्‍या देवाच्या क्रोधाने भरलेल्या सोन्याच्या सात वाट्या त्या सात देवदूतांना दिल्या.
8तेव्हा देवाचे ‘तेज’ व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या ‘धुराने मंदिर भरून गेले;’ आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ संपेपर्यंत ‘कोणालाही मंदिरात जाता आले नाही.’

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in