YouVersion Logo
Search Icon

गीतरत्न 5

5
1हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.
विरहाग्नी
2मी निद्रिस्त आहे, तरी माझे मन जागृत आहे; ऐका! माझा वल्लभ दार ठोकत आहे! त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे; तो म्हणतो, “माझे भगिनी, माझे प्रिये, माझे कपोते, माझे विमले, माझ्यासाठी दार उघड; माझे डोके दवाने थबथबले आहे; माझी झुलपे रात्रीच्या दहिवरबिंदूंनी भरून गेली आहेत.”
3“मी पेहराव उतरवला आहे, तो पुन्हा कसा लेऊ? मी पाय धुतले आहेत, ते पुन्हा कसे मळवू?”
4माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला, तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले.
5मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातांना लागला, माझ्या बोटांवरून त्याचा द्रव थिबकला.
6मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले, आणि पाहते तर तो निघून गेला होता. तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता; मी त्याचा शोध केला, पण तो सापडला नाही; मी त्याला हाका मारल्या पण त्याने उत्तर दिले नाही.
7नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला.
8यरुशलेमाच्या कन्यांनो, मी तुम्हांला शपथ घालून विनंती करते की माझा वल्लभ तुम्हांला आढळला तर त्याला सांगा मी प्रेमज्वराने पीडित आहे.
वधूकडून वराची प्रशंसा
9स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे? तू आम्हांला शपथ घालतेस तर तुझ्या वल्लभात इतरांहून अधिक ते काय आहे?
10माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे; तो लाखात मोहरा आहे.
11त्याचे शिर बावनकशी सोन्यासारखे आहे; त्याची झुलपे कुरळी व डोमकावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत.
12त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत; ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत.
13त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतींचे ताटवे आहेत. त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यांतून गंधरस स्रवतो.
14त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.
15त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसवलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत. त्याचा बांधा लबानोनासारखा आहे; तो गंधसरूसारखा उमदा आहे;
16त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in