YouVersion Logo
Search Icon

1 करिं. 1

1
नमस्कार व उपकारस्तुती
1देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला, पौल आणि बंधू सोस्थनेस यांजकडून, 2करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस, 3देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून कृपा व शांती असो.
4ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेबद्दल मी सतत तुमच्यासाठी माझ्या देवाचे उपकार मानतो. 5त्याने तुम्हास प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे. 6जशी ख्रिस्ताविषयी साक्ष खरी असल्याची खात्री तुम्हामध्ये झाली तसल्याच प्रकारे त्याने तुम्हासही संपन्न केले आहे. 7म्हणून तुम्हांत कोणत्याही आत्मिक दानाची कमतरता नाही, तर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याची वाट पाहता. 8तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे. 9ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागितेत तुम्हास बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
ख्रिस्ती मंडळीतील पक्षाभिमानाची वृत्ती
10तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे. 11कारण माझ्या बंधूनो ख्लोवेच्या मनुष्यांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत. 12माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येकजण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी केफाचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.” 13ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा झाला का? 14मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही. 15यासाठी की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला, असे कोणीही म्हणू नये. 16स्तेफनाच्या घरच्यांचा सुद्धा मी बाप्तिस्मा केला, याव्यतिरीक्त, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही. 17कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर शुभवर्तमान सांगण्यासाठी पाठवले, ते देखील मानवी ज्ञानाने नव्हे, यासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूचे सामर्थ्य व्यर्थ होऊ नये.
वधस्तंभाच्या ठायी असलेले सामर्थ्य
18कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे,
“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि
बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.”
20ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? 21म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. 22कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. 24परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. 25तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तीशाली आहे.
26तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते, 27त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे. 28कारण जगातील देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे. 29यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये. 30कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे. 31यासाठी की नियमशास्त्रात असे लिहिले आहे, “जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी बाळगावा.”

Currently Selected:

1 करिं. 1: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in