YouVersion Logo
Search Icon

1 पेत्र. 3

3
पती व पत्नी
1-2आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. 3तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; 4पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. 5कारण देवावर आशा ठेवणार्‍या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. 6उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात.
7पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये.
ख्रिस्तनिष्ठ मनुष्यांना शोभणारी सहानुभूती
8शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. 9तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
10कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो
त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत
11त्याने वाईट सोडून चांगले करावे,
शांतीचा शोध करून तिला अनुसरावे.
12कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात
पण वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर असते.”
अन्याय सोसून ख्रिस्ताने घालून दिलेले उदाहरण
13आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील? 14पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका. 15पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा. 16आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी. 17कारण चांगले केल्याबद्दल तुम्ही सोसावे हे जर देवाला बरे वाटते, तर वाईट केल्याबद्दल सोसण्यापेक्षा ते अधिक बरे. 18कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला. 19आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली. 20नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले. 21आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. 22तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

Currently Selected:

1 पेत्र. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in