YouVersion Logo
Search Icon

1 शमु. 16

16
राजपदासाठी दाविदाचा तैलाभ्यंग
1मग परमेश्वराने शमुवेलाला सांगितले की, “मी इस्राएलावर राज्य करण्यापासून शौलाला नाकारले आहे, तर तू किती काळ त्यासाठी शोक करशील? आपल्या शिंगात तेल भरून चल. इशाय बेथलहेमी याच्याकडे मी तुला पाठवितो. कारण मी त्याच्या एका मूलाला माझ्यासाठी राजा म्हणून निवडले आहे.” 2तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? जर शौल ऐकेल तर तो मला जीवे मारील.” मग परमेश्वर म्हणाला, “एक कालवड आपल्याबरोबर घे आणि मी देवाकडे यज्ञ करण्यास आलो आहे असे म्हण. 3त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर.” 4तेव्हा परमेश्वराने जे सांगितले ते शमुवेलाने केले आणि मग बेथलेहेमास गेला. नगराचे वडीलजन भीत भीत त्यास भेटायास आले व त्यांनी त्यास विचारले, “तुम्ही शांतीनेच आला आहात ना?” 5त्याने म्हटले, “शांतीने; मी परमेश्वरास यज्ञ अर्पण करायास आलो आहे. मजबरोबर यज्ञास येण्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा.” त्याने इशाय व त्याचे पुत्र यांना शुद्ध केल्यावर त्यांना यज्ञास बोलाविले. 6ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.” 7परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.” 8मग इशायाने अबीनादाबाला बोलाविले आणि त्यास शमुवेलापुढे चालविले. परंतु शामुवेलाने म्हटले, “यालाही परमेश्वराने निवडले नाही.” 9मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.” 10असे इशायाने आपल्या सात पुत्रांना शमुवेलापुढे चालविले. “परंतु शमुवेलाने इशायला म्हटले, यांपैकी कोणालाच परमेश्वराने निवडले नाही.” 11तेव्हा शमुवेलाने इशायला म्हटले, “तुझे सर्व पुत्र आले आहेत का?” मग तो म्हणाला, “आणखी एक धाकटा आहे, तो राहिला आहे. तो मेंढरे राखीत आहे.” तेव्हा शमुवेलाने त्यास म्हटले. “त्याला येथे बोलावून आण त्याच्या येण्यापूर्वी आम्ही जेवायला बसणार नाही.” 12मग त्याने त्यास बोलावून आणले तो तांबूस रंगाचा आणि सुंदर डोळ्यांचा होता आणि त्याचे रुप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, “उठून ह्याला अभिषेक कर; कारण हाच तो आहे.” 13मग शमूवेलाने तेलाचे शींग घेऊन त्याच्या भावांच्यामध्ये त्यास अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दावीदावर येऊन राहिला. त्यानंतर शमुवेल उठून रामा येथे गेला.
शौलाला रंजवण्यासाठी दावीद वीणा वाजवतो
14मग परमेश्वराच्या आत्म्याने शौलास सोडले आणि देवापासून एक दुष्ट आत्मा त्यास त्रास करू लागला. 15तेव्हा शौलाचे चाकर त्यास म्हणाले, “आता पाहा देवाकडून एक दुष्ट आत्मा तुम्हास त्रास देतो आहे. 16आपण विणा वाजविणारा निपुण असा एक पुरुष शोधू. तशी आज्ञा आमच्या धन्याने आपल्यासमोर जे चाकर आहेत त्यास द्यावी. मग जेव्हा देवाकडून दुरात्मा तुम्हास त्रास देऊ लागेल, तेव्हा तो आपल्या हाताने ती वाजवील आणि तुम्हास बरे वाटेल.” 17मग शौलाने आपल्या चाकरास म्हटले, “जा, चांगला वाजविणारा पुरुष शोधून माझ्याकडे आणा.” 18मग चाकरातून एका तरूणाने उत्तर दिले की, पाहा वाजविण्यात निपुण, पराक्रमी, लढाऊ पुरुष व उत्तम वक्ता व मनोहर रूपाचा व ज्याला परमेश्वर अनुकूल आहे असा पुरुष मी पहिला आहे, तो इशाय बेथलहेमी ह्याचा पुत्र आहे. 19मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.” 20तेव्हा इशायने भाकरीने लादलेले एक गाढव व द्राक्षरसाचा बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद याच्या हाताने शौलाकडे पाठवले. 21दावीद शौलाजवळ येऊन त्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्याची त्याच्यावर फार प्रीती बसली आणि तो त्याचा शस्त्र वाहक झाला. 22मग शौलाने इशायजवळ निरोप पाठवून सांगितले मी तुला विनंती करतो की, आता दावीदाला माझ्या जवळ राहू दे; कारण त्याच्यावर माझी कृपाद्दष्टी झाली आहे. 23मग जेव्हा केव्हा देवापासून दुष्ट आत्मा शौलावर येत असे, “तेव्हा दावीदाने विणा घेऊन आपल्या हाताने वाजवी. मग शौल शांत होऊन बरा होई, व तो दुष्ट आत्म्या त्यास सोडून जाई.”

Currently Selected:

1 शमु. 16: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in