YouVersion Logo
Search Icon

2 करिं. 9

9
1तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही. 2कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळजण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
3तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी. 4नाही तर कदाचित, मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला, तर या खातरीमुळे आमची आम्ही म्हणत नाही की, तुमची फजिती होईल. 5म्हणून मला हे आवश्यक वाटते की, ह्यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी; म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील.
वर्गणी कशी द्यावी
6हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. 7प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो. 8तुमच्याजवळ सर्व गोष्टींत सदा, सर्व पुरवठा रहावा आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हास सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे.
9असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे;
“तो गरीबांना उदारहस्ते देतो,
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.”
10आता जो पेरणार्‍याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरवील आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील. 11म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकारस्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल. 12कारण या सेवेचे काम केवळ पवित्रजनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही पण देवाच्या पुष्कळ उपकारस्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते. 13या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात; 14आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात.
15देवाचे अवर्णनीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो!

Currently Selected:

2 करिं. 9: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in