YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 22

22
यहूद्यांबरोबर पौलाने केलेले भाषण
1बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे काही आता तुम्हास प्रत्युत्तर करतो ते ऐका. 2तो आपणाबरोबर इब्री भाषेत बोलत आहे हे ऐकून ते अधिक शांत झाले, मग त्याने म्हटले.
3मी यहूदी आहे, माझा जन्म किलकीयातील तार्स नगरांत झाला आणि मी या शहरांत गमलियेलच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडीलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहात तसा मीही होतो. 4पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी ‘या मार्गाचा’ पाठलाग केला. 5त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गही माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरूशलेम शहरात शासन करावयास आणावे. 6मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. 7तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. 8मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” 9तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. 10मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.” 11त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले; म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
12मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. 13तो माझ्याकडे आला व जवळ उभा राहून मला म्हणाला, शौल भाऊ, इकडे पहा, तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. 14मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी. 15कारण जे तू पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. 16तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
17मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. 18तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.” 19तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. 20तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो. 21तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”
रोमन नागरिक म्हणून असलेल्या पौलाचा हक्क
22या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही. 23ते ओरडत व आपली बाह्यवस्त्रे अंगावरून काढून टाकून आकाशात धूळ उधळीत असता. 24सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. 25मग त्यांनी त्यास वाद्यांनी ताणले, तेव्हा जवळ उभ्या असलेल्या शताधीपतीला पौलाने म्हटले, “रोमन मनुष्यास व ज्याला दोषी ठरवले नाही अशाला तुम्ही फटके मारणे कायदेशीर आहे काय?” 26हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे. 27तेव्हा सरदार त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “मला सांग, तू रोमन आहेस काय?” त्याने म्हटले, “होय.” 28सरदाराने उत्तर दिले, “मी हा नागरिकपणाचा हक्क फार मोल देऊन विकत घेतला आहे.” पौलाने म्हटले, “मी तर जन्मतःच रोमन आहे.” 29ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते.
सन्हेंद्रिन सभेपुढे पौलाचे आत्मसमर्पण
30यहूदी लोकांनी त्याच्यावर जो आरोप आणला तो काय आहे हे निश्चितपणे कळावे असे सरदाराच्या मनात होते, म्हणून दुसऱ्या दिवशी त्याने त्यास मोकळे केले आणि मुख्य याजक लोक व सगळी न्यायसभा ह्यांना एकत्र होण्याचा हुकुम करून पौलाला खाली आणून त्याच्यापुढे उभे केले.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रेषि. 22