YouVersion Logo
Search Icon

प्रेषि. 26

26
अग्रिप्पापुढे पौलाने केलेले भाषण
1अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले. 2अग्रिप्पा महाराज, मी स्वतःला धन्य समजतो कारण यहूद्यांनी आपल्यासमोर माझ्याविरुद्ध केलेल्या आरोपांचा बचाव करण्याची संधी आज मिळाली. 3विशेषत, यहूदी चालीरीति आणि प्रश्न इत्यादी गोष्टींची आपणांला चांगल्या प्रकारे माहिती असल्याने तर हे जास्तच खरे म्हणावे लागेल, तेव्हा आपण माझे बोलणे धीराने ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो.
4मी माझे जीवन तरुणपणापासून माझ्या प्रांतात व यरूशलेम शहरात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांस चांगले माहीत आहे. 5ते मला बऱ्याच काळापासून ओळखतात आणि त्यांची इच्छा असेल तर मी एक परूशी म्हणजे आमच्या यहूदी धर्माच्या एका कट्टर गटाचा सभासद या नात्याने कसा जगत आलो याविषयी ते साक्ष देऊ शकतील. 6आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे; 7ते वचन प्राप्त होण्याची आशा बाळगून आमचे बारा वंश देवाची सेवा रात्रंदिवस एकाग्रतेने करीत आहेत, महाराज, तीच आशा बाळगल्याबद्दल माझ्यावर यहूद्यांनी आरोप ठेवला आहे. 8देव मरण पावलेल्यांना परत उठवितो, असे तुमच्यापैकी कित्येकांना विश्वास ठेवण्यास अयोग्य का वाटावे. 9नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. 10आणि नक्की हेच मी यरूशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले. 11अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
12एकदा दिमिष्क शहराला जाण्यासाठी मुख्य याजकांनी मला अधिकार व परवानगी दिली तेव्हा महाराज. 13वाटेत भर दुपारच्या वेळी मी माझ्या व माझ्यासमवेत असणाऱ्यांच्या भोवती स्वर्गीय प्रकाश फाकलेला पाहिला, तो प्रकाश सूर्यापेक्षाही जास्त प्रखर होता. 14आम्ही सर्व खाली जमिनीवर पडलो आणि इब्री भाषेत माझ्याशी बोलताना एक वाणी मी ऐकली, ती वाणी म्हणाली, “शौला, शौला, माझा छळ तू का करतोस? अणकुचीदार काठीवर लाथ मारणे तुला हानिकारक आहे.” 15आणि मी म्हणालो, ‘प्रभू, तू कोण आहेस?’ प्रभूने उत्तर दिले, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस. 16आता ऊठ आणि उभा राहा! या कारणांसाठी मी तुला दर्शन दिले आहे तुला सेवक म्हणून नेमावे व जे काही तुला दाखविले व जे दाखवीन त्याचा साक्षीदार म्हणून तुला नेमावे. 17या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन. 18मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”
19यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही. 20उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेम शहरातील, यहूदीया प्रांतातील सर्व आणि परराष्ट्रीय लोकांससुद्धा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली, त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले. 21या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 22परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे, जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही. 23त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त #मसीहा तो दुःखसहन करील आणि मरण पावलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल, यहूदी लोकांस तसेच परराष्ट्रीयांनाही देव प्रकाशाची घोषणा करील.
24पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.” 25पौलाने उत्तर दिले, “फेस्त महाराज, मी वेडा नाही; तर ज्या गोष्टी खऱ्या आहेत आणि अगदी योग्य आहेत, त्यांच्याविषयीच मी बोलत आहे. 26येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. 27अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यानी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे.” हे मला नक्की माहीत आहे. 28यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?” 29पौलाने उत्तर दिले, “थोड्या वेळात म्हणा अगर जास्त वेळात म्हणा, मी जसा आहे तसे केवळ तुम्हीच नव्हे तर आज जे जे येथे बसून माझे बोलणे ऐकत आहेत त्या सर्वांनी माझ्यासारखे या साखळदंडाखेरीज, विश्वास ठेवणारे व्हावे, अशी माझी देवाला नम्र विनंती आहे.”
30यानंतर राजा, बर्णीका, राज्यपाल आणि त्यांच्याबरोबर इतर जे तेथे बसले होते, ते सर्व उठले. 31ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.” 32अग्रिप्पा फेस्ताला म्हणाला, “या मनुष्याने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर त्यास सोडून देता आले असते.”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in