YouVersion Logo
Search Icon

कल. 2

2
1कारण माझी इच्छा आहे की, तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लावदीकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरीकरित्या पाहिलेले नाही, अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हास समजून, 2ते परिश्रम ह्यांसाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
ख्रिस्ताशी संयुक्त होणे
3-4त्याच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लाघवी भाषणांनी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे. 5कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्याजवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. 6आणि म्हणून, ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. 7तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हास शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन, उपकारस्मरण करीत, त्यामध्ये वाढत जा.
खोट्या शिक्षणाविरुद्ध इशारा
8तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्‍या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही. 9कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. 10तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा, 11आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे. 12त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला, 13आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे; 14आणि आपल्या आड येणारा जो नियमांचा हस्तलेख आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले. 15त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निःशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्यांचे उघड प्रदर्शन केले.
16म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून, सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. 17या गोष्टी तर येणार्‍या गोष्टींची छाया अशा आहेत; पण शरीर ख्रिस्ताचे आहे. 18लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका; 19असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या द्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते.
20म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता? 21शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको 22अशा नियमांतील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणार्‍या गोष्टी आहेत. 23या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.

Currently Selected:

कल. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in