YouVersion Logo
Search Icon

अनु. 5

5
दहा आज्ञा
निर्ग. 20:1-17
1मोशेने सर्व इस्राएल लोकांस एकत्र बोलवून सांगितले, “इस्राएल लोकहो, आज मी जे विधी आणि नियम सांगतो ते ऐका. तुम्ही ते शिका आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करा. 2होरेब पर्वताजवळ असताना आमचा देव परमेश्वर ह्याने आपल्याबरोबर करार केला होता. 3हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता. 4त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून परमेश्वराने आपल्याशी तोंडोतोंड भाषण केले. 5पण त्या अग्नीच्या भीतीने तुम्ही तो पर्वत चढला नाही. तेव्हा त्याचे म्हणणे तुमच्यापर्यंत पोचवायला मी तुम्हा दोघांच्यामध्ये उभा राहिलो. तेव्हा परमेश्वर म्हणाला, 6मिसर देशामध्ये तुम्ही गुलामीत होता तेथून मी तुम्हास बाहेर काढले, तो मी परमेश्वर, तुमचा देव आहे. 7माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत. 8तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ती करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका. 9त्यांच्यापुढे झुकू नका किंवा त्यांची सेवा करु नका. कारण मी तुमचा देव परमेश्वर ईर्ष्यावान आहे. जे माझा द्वेष करतात, त्यांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो त्यांच्या मुलांना एवढेच नव्हे तर त्याच्या चार पिढ्यांना शासन करीन. 10पण जे माझ्यावर प्रेम करतील आणि माझ्या आज्ञा पाळतील त्यांच्यावर मी दया करीन. त्यांच्या हजारो पिढ्यांवर माझी कृपा राहील. 11तुमचा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेवू नका. जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. 12शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र दिवस म्हणून पाळावा. 13सहा दिवस तुम्ही श्रम करून आपले सर्व काम करा. 14पण सातवा दिवस हा तुमचा देव परमेश्वरा ह्याच्या सन्मानार्थ शब्बाथाचा दिवस आहे. म्हणून त्यादिवशी कोणीही काम करता कामा नये. तुम्ही तुमची मुले, मुली, किंवा दासदासी, परके, एवढेच नव्हे तर तुमचे बैल, गाढव इत्यादी पशू यांनी सुद्धा काम करु नये. तुमच्या गुलामांनाही तुमच्या सारखाच विसावा घेता आला पाहिजे. 15मिसर देशात तुम्ही गुलाम होता याचा विसर पडू देऊ नका. तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या सामर्थ्याने तुम्हास तेथून बाहेर आणले, त्याने तुम्हास मुक्त केले. म्हणून शब्बाथ नेहमी विशेष दिवस म्हणून पाळा, ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. 16आपल्या आईवडीलांचा मान ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हास दीर्घायुष्य मिळेल. तुम्हास दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल. 17कोणाचीही हत्या करु नका. 18व्यभिचार करु नका. 19चोरी करु नका. 20आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नका. 21दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दासदासी, गुरे गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.” 22पुढे मोशे म्हणाला, ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हास मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वतापाशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिल्या.
लोकांस वाटणारी भीती
निर्ग. 20:18-21
23पर्वत धगधगून पेटलेला असताना तुम्ही त्याची वाणी काळोखातून ऐकलीत. तेव्हा तुमच्या वंशातील वडीलधारे आणि प्रमुख माझ्याकडे आले. 24आणि म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हास त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्यास प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव मनुष्याशी बोलला तरी मनुष्य जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे. 25पण पुन्हा परमेश्वर देव आमच्याशी बोलला तर आम्ही नक्की मरू. तो भयंकर अग्नी आम्हास बेचीराख करील. आणि आम्हास मरायचे नाही. 26साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही. 27तेव्हा मोशे, तूच आपला देव परमेश्वर ह्याच्या जवळ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून घे. आणि मग ते आम्हास सांग. आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू.” 28हे तुमचे बोलणे परमेश्वराने ऐकले. तो मला म्हणाला, “मी सर्व ऐकलेले आहे आणि ते ठीकच आहे. 29ते माझे भय धरून मजशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे. 30त्यांना सांग तुम्ही परत आपापल्या जागी जा. 31पण मोशे तू इथेच थांब. त्यांना द्यायच्या सर्व आज्ञा, विधी नियम मी तुला सांगतो. त्यांना मी जो देश वतन म्हणून देत आहे तेथे त्यांनी ते पाळावे.” 32तेव्हा तुमचा देव परमेश्वर याने दिलेल्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा. 33तुमचा देव परमेश्वर ह्याने दाखवलेल्या मार्गानेच चाला. म्हणजे तुम्हास वतन दिलेल्या प्रदेशात तुम्ही सुखाने व दीर्घकाळ रहाल.

Currently Selected:

अनु. 5: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in