YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 10

10
आठवी पीडा: टोळांची पीडा
योए. 1:2-4
1नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे मन व त्याच्या सेवकांची मने मीच कठीण केली आहेत. माझ्या सामर्थ्याची चिन्हे त्यांच्यामध्ये दाखवावी म्हणून मी हे केले. 2मी मिसऱ्यांना कसे कठोरपणे वागवले आणि त्यांच्यामध्ये अनेक सामर्थ्याची चिन्हे कशी केली हे तुम्ही तुमच्या मुलांना व नातवांना सांगावे म्हणून मी हे केले. या प्रकारे मी परमेश्वर आहे हे तुम्हास कळेल.” 3मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू माझ्यापुढे नम्र होण्याचे कोठवर नाकारशील? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे. 4जर तू माझ्या लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील, तर उद्या मी तुझ्या देशावर टोळधाड आणीन. 5ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील की तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्यास टोळ खाऊन टाकतील. शेतांतील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील. 6ते टोळ तुझी घरे, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, व्यापून टाकतील. तुझ्या वाडवडिलांनी आजपर्यंत पाहिले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील.” नंतर मोशे फारोसमोरून निघून गेला. 7फारोचे सेवक फारोला म्हणाले, “हा मनुष्य आम्हावर कोठपर्यंत संकटे आणणार आहे? या इस्राएलांना आपला देव परमेश्वर ह्यांची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे. मिसराचा नाश झाला आहे हे तुम्हास अजून कळत नाही काय?” 8मोशे व अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणले, तो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु कोण कोण जाणार आहेत?” 9मोशेने उत्तर दिले, “आमची तरुण व वृध्द मंडळी, तसेच आम्ही, आमची मुले व कन्या, आमचे शेरडामेंढरांचे कळप व गुरेढोरे या सर्वांस आम्ही घेऊन जाणार. कारण आम्हांला परमेश्वराचा उत्सव करायचा आहे.” 10फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ दिले तर परमेश्वराची शपथ. सांभाळा, पाहा, तुमच्या मनात काहीतरी वाईट आहे. 11नाही! फक्त तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. कारण तेच तर तुम्हास पाहिजे आहे.” त्यानंतर त्यांना फारोपुढून घालवून दिले. 12मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे टोळधाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.” 13मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. 14ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. 15त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरातील कुठल्याच झाडाझुडपांवर एकही पान राहिले नाही. 16फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध व तुम्हाविरुध्द मी पाप केले आहे. 17तेव्हा या वेळी माझ्या पापाबद्दल मला क्षमा करा आणि हे टोळ माझ्यापासून दूर करण्याकरिता तुमचा देव परमेश्वर याकडे प्रार्थना करा.” 18मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 19तेव्हा परमेश्वराने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळांना उडवून तांबड्या समुद्रात लोटले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही. 20तरी परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही.
नववी पीडा: निबिड अंधाराची पीडा
21मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हास चाचपडत जावे लागेल.” 22तेव्हा मोशेने आपला हात आकाशाकडे उभारिला आणि तीन दिवस सर्व मिसर देशात निबिड अंधकार झाला. 23कोणालाही काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस आपले घर सोडून गेले नाही; परंतु जिथे इस्राएली लोकांची वस्ती होती तेथे प्रकाश होता. 24तेव्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमचे कळप व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.” 25मोशे म्हणाला, “आमचा देव परमेश्वर याच्यासाठी यज्ञ करण्यास यज्ञपशू व होमबली तू आमच्या हाती दिले पाहिजेत. 26यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमची गुरेढोरेही आमच्याबरोबर नेऊ. एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमचा देव परमेश्वर याला यज्ञ व होमार्पण करण्यासाठी यातूनच घ्यावे लागेल आणि परमेश्वराची सेवा करण्यास आम्हांला काय लागेल ते आम्ही तेथे पोहचेपर्यंत सांगता येणार नाही;” 27परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांस जाऊ देईना. 28मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!” 29मोशे म्हणाला, “तू बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”

Currently Selected:

निर्ग. 10: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in