YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 13

13
प्रथमजन्मलेल्यास पवित्र म्हणून वेगळे ठेवणे
1मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 2“इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.”
बेखमीर भाकरीचा सण
निर्ग. 12:14-20
3मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. 4आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात. 5परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी. 6या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा; 7या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये. 8या दिवशी परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे. 9हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले. 10म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा.
प्रथमजन्मलेले अपत्य
11परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल. 12तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत. 13गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा. 14पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले. 15आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो. 16तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”
मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ
निर्ग. 40:34-38; गण. 9:15-23; 1 राजे 8:10-11
17फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.” 18म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्त्र बाहेर निघाले होते. 19मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.” 20मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला. 21त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे. 22दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.

Currently Selected:

निर्ग. 13: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in