YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 14

14
तांबडा समुद्र ओलांडणे
1परमेश्वर मोशेला म्हणाला, 2“इस्राएल लोकांस असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये व बआल-सफोन जवळ असलेल्या पीहहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा. 3इस्राएली लोकांविषयी फारो म्हणेल, ते रानात भटकत आहेत. रानात त्यांचा कोंडमारा झाला आहे. 4मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले. 5इस्राएल लोक निसटून गेल्याचे मिसराच्या राजाला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांस आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले?” 6तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांस घेऊन तो निघाला. 7त्याने सहाशे उत्तम योद्धे व मिसरातील सर्व रथ त्यांवरील सरदारांसोबत आपल्याबरोबर घेतले. 8इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले. 9फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. मिसरी सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्त्राएल लोकांनी लाल समुद्र व बआल-सफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले. 10फारो व मिसरी सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले. 11ते मोशेला म्हणाले, “आम्हांला मिसरात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हांला तू मिसरातून बाहेर का काढले? 12मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो, आम्ही मिसरामध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिसऱ्यांचे दास्य पत्करले.” 13परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसराचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे राहा.” 15मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा धावा करीत काय बसलास? इस्राएल लोकांस सांग की पुढे चला. 16तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील. 17आणि पाहा, मी स्वतः मिसऱ्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील. आणि फारो व त्याचे सर्व सैन्य, स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल. 18फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिसरी लोकांस कळेल.” 19इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला. 20अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. 21मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली. 22आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले. 23त्यानंतर तेव्हा मिसऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. 24तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिसराच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसराच्या लोकांस कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलाच्या बाजूने आम्हाविरूद्ध लढत आहे.”
पाठलाग करणाऱ्या मिसरी लोकांचा पाण्यात बुडून मृत्यू
26नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिसऱ्यावर, त्यांच्या रथावर व स्वारांवर येईल.” 27मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसराच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. 28पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यांच्यातले कोणीही वाचले नाही. 29परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमीवरून भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसऱ्यांच्या हातातून इस्त्राएल लोकांस सोडविले आणि मिसरी समुद्रतीरी मरून पडलेले इस्राएल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. 31परमेश्वराने मिसऱ्यांना आपला प्रबळ हात दाखविला तो इस्राएल लोकांनी पाहिला, तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.

Currently Selected:

निर्ग. 14: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in