YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 4

4
देवाकडून मोशेला शक्ती प्रदान करणे
1मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.” 2परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.” 3मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला. 4परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला. 5“म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.” 6मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला; 7मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला. 8मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, व पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. 9ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.” 10मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहित आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.” 11मग परमेश्वर त्यास म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले? मनुष्यास मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? 12तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखाला साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.” 13परंतु मोशे म्हणाला, हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव. 14मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्यास चांगले बोलता येते हे मला माहीत आहे. तो तुला भेटायला येत आहे. तुला पाहून त्यास मनात आनंद होईल. 15तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांना साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन. 16आणि तो तुझ्यासाठी लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि त्याने काय बोलावे हे सांगणारा तू त्यास देवासारखा होशील. 17तू आपल्या हाती ही तुझी काठी घे. हिच्या योगे तू चिन्हे करशील.”
मोशे मिसर देशास परत येतो
18मग मोशे आपला सासरा इथ्रो याच्याकडे परत गेला. तो त्यास म्हणाला, “मला मिसरातील माझ्या भाऊबंदांकडे जाऊ द्या. ते अद्याप जिवंत आहेत की नाहीत ते मला पाहू द्या.” इथ्रो मोशेला म्हणाला, शांतीने जा. 19मिद्यान प्रांतात असताना परमेश्वर मोशेला म्हणाला, “आता मिसर देशात परत जा. जे लोक तुला ठार मारू पाहत होते ते आता मरण पावले आहेत.” 20तेव्हा मोशेने आपली पत्नी व आपल्या मुलांना गाढवावर बसवले व त्यांना घेऊन तो मिसर देशाला माघारी जायल निघाला. तो देवाची काठी आपल्या हाती घेऊन चालला. 21परमेश्वर मोशेला म्हणाला, तू मिसरात परत जाशील तेव्हा पाहा, जे सर्व चमत्कार मी तुझ्या हाती ठेवले आहे ते तू फारोपुढे करून दाखव. तथापि मी त्याचे मन कठीण करीन, आणि तो लोकांस जाऊ देणार नाही. 22मग तू फारोला सांग की, परमेश्वर म्हणतो इस्राएल माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. 23परमेश्वर म्हणतो, मी तुला सांगत आहे की “तू माझ्या पुत्राला माझी उपासना करण्याकरता जाऊ दे!” जर तू त्यास जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या ज्येष्ठ पुत्राला ठार मारीन. 24मोशे प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला. 25परंतु सिप्पोराने एक गारगोटीची धारदार सुरी घेतली व तिने आपल्या मुलाची सुंता केली. मग तिने मुलांची अग्रत्वचा घेतली आणि ती मोशेच्या पायावर ठेवून ती त्यास म्हणाली, “खचीत तू माझा रक्ताने मिळवलेला पती आहेस.” 26तेव्हा परमेश्वराने त्यास पीडण्याचे सोडले. रक्ताने मिळविलेला पती असे तिने सुंतेला उद्देशून म्हटले. 27मग परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “मोशेला भेटायला रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर जाऊन मोशेला भेटला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. 28परमेश्वराने त्यास जे सर्वकाही सांगून पाठवले होते ते, जी सर्व चिन्हे करून दाखवायची आज्ञा दिली होती ती मोशेने अहरोनाला सांगितली. 29मग मोशे व अहरोन यांनी जाऊन इस्राएली वंशजांचे सर्व वडीलजन एकत्र जमवले. 30नंतर परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांस कळवले; त्यांना चिन्हे करून दाखवली. 31तेव्हा लोकांनी विश्वास ठेवला. परमेश्वराने इस्राएली घराण्याची भेट घेऊन त्यांचे दुःख पाहिले आहे हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची उपासना केली.

Currently Selected:

निर्ग. 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in