YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 8

8
दुसरी पीडा: बेडकांची पीडा
1मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांस माझी उपासना करण्याकरता जाऊ दे. 2जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन. 3नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील. 4तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.” 5मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.” 6मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला. 7तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले. 8मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.” 9मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्या वेळी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.” 10फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही. 11बेडूक तुम्हापासून, तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.” 12मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली. 13मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले. 14लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला. 15बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
तिसरी पीडा: उवांची पीडा
16मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.” 17त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या. 18जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले. 19तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
चौथी पीडा: गोमाश्यांची पीडा
20मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांस जाऊ दे. 21जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील. 22तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल. 23तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन#भेद करीन . उद्या हा चमत्कार होईल.” 24अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली. 25म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.” 26परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही, कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा असेल, त्यामुळे आम्ही तो मिसरी लोकांसमोर केला तर ते आम्हांवर दगडफेक करायचे नाहीत काय? 27तर आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू.” 28तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. पण तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.” 29मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.” 30तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली. 31या प्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही. 32परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकांस जाऊ दिले नाही.

Currently Selected:

निर्ग. 8: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in