11
विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे
1विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. 2विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली. 3विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत.
विश्वासाचे जीवन
उत्प. 4:1-6; उत्प. 5:18-24; उत्प. 6:5-8:22
4विश्वासाने, हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले; त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो.
5हनोखाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून, त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले; आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की, तो देवाला संतोषवीत असे. 6पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
7विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
अब्राहामाचा विश्वास
उत्प. 15:1-6; 21:1-7
8विश्वासाने, अब्राहामाने, त्यास जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला.
9विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्यात वस्ती होती. 10कारण, ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहाम वाट पाहत होता.
11विश्वासाने, सारेलाही, ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली; कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले. 12म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्या पासून संख्येने आकाशातील तार्यांप्रमाणे, समुद्राच्या किनार्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली.
13हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. 14कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात. 15आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. 16पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
पूर्वजांचा विश्वास
उत्प. 22:1-14; 48:8-16; 50:22-25
17अब्राहामाने, त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने, इसहाकाचे अर्पण केले; म्हणजे, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला. 18त्याच्याविषयी हे म्हणले होते की, ‘इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.’ 19तरी, देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायलादेखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून, जणू लाक्षणिक अर्थाने, परतही मिळाला.
20इसहाकाने, याकोबाला व एसावाला येणार्या गोष्टींविषयी विश्वासाने, आशीर्वाद दिला.
21याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने, आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले.
22विश्वासाने, योसेफाने, मरतेवेळी, इस्राएलाच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थींविषयी आज्ञा दिली.
मोशेचा विश्वास
निर्ग. 2:1-10; 12:31-51
23विश्वासाने, मोशे जन्मल्यावर, त्यास त्याच्या आई-वडीलांनी तीन महिने लपवून ठेवले; कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
24मोशेने, विश्वासाने, तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकबूल केले. 25पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, 26आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती.
27विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.
28विश्वासाने त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्याने त्यांना शिवू नये.
29विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून, कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले.
30विश्वासाने, त्यांनी सात दिवस, यरीहोच्या तटासभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले.
31विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.
32आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. 33विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. 34त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. 35कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. 36आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. 37त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. 38जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.
39या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही. 40कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.