9
जुने पवित्रस्थान नव्या पवित्रस्थानाचे दर्शक आहे
1आता पहिल्या करारातही उपासनेसंबंधी काही नियम होते आणि एक पवित्रस्थान होते. पण ते पृथ्वीवरचे होते 2कारण मंडपामध्ये खोल्या तयार केल्या होत्या, बाहेरील खोली त्यास पवित्रस्थान असे म्हणले आहे. त्यामध्ये दिव्यांचे झाड, मेज व समर्पित भाकरी होत्या. 3आणि दुसऱ्या पडद्यामागे एक मंडप होता, त्यास परमपवित्रस्थान म्हणत 4त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या. 5या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही. 6या वस्तूंच्या अशा व्यवस्थेनुसार याजकगण उपासना करायला पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. 7पण केवळ एकटा महायाजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या मंडपात जाई, तो स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय तो आत जात नाही. 8याद्वारे पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली नाही. 9तो मंडप वर्तमान काळात दृष्टांतरूप आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्यास वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत ती अर्पिण्यात येतात. 10हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य
11पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक म्हणून आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, मनुष्याच्या हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा मंडपाच्याव्दारे, 12बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; 13कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, 14तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? 15ख्रिस्त याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की, पहिल्या करारासंबंधी जी उल्लंघने झाली त्यापासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने, जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे.
16जेथे मृत्युपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाऱ्याचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. 17कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. 18म्हणून पहिल्या कराराची स्थापना रक्तावाचून झाली नाही. 19कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. 20तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हास आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.” 21त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. 22खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही.
ख्रिस्ताच्या स्वार्पणाचे अनन्यत्व
23म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. 24कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला. 25जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. 26तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
27ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, 28तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.