YouVersion Logo
Search Icon

याको. 3

3
जीभ ताब्यात ठेवणे
1माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. 2कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे. 3पहा, आपण घोड्यांच्या तोंडांत लगाम घालतो की, त्यांनी आपले ऐकावे; आणि त्याद्वारे आपण त्यांचे सर्व शरीर वळवतो. 4तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात. 5त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. 6आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. 7कारण प्रत्येक जातीचे पशू व पक्षी आणि सरपटणारे व जलचर प्राणी, कह्यात येतात आणि मनुष्याने कह्यात आणले आहेत. 8पण कोणीही मनुष्य आपली जीभ कह्यात आणू शकत नाही. ती अनावर व अपायकारक असून, ती प्राणघातक विषाने भरलेली आहे. 9आपण तिचाच उपयोग करून परमेश्वर पित्याचा धन्यवाद करतो; आणि देवाच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण झालेल्या मनुष्यांना तिनेच शाप देतो. 10एकाच मुखातून स्तुती आणि शाप बाहेर निघतात. माझ्या बंधूंनो, या गोष्टी अशा होऊ नयेत. 11झर्‍याच्या एकाच मुखातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? 12माझ्या बंधूंनो, अंजिराचे झाड जैतुनाची फळे देईल काय? किंवा द्राक्षवेल अंजीरे देईल काय? तसेच खाऱ्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही.
खोटे व खरे ज्ञान
13तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी. 14पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका. 15हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते. 16कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते. 17पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते. 18आणि शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.

Currently Selected:

याको. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in