YouVersion Logo
Search Icon

शास्ते 19

19
एक लेवी आणि त्याची उपपत्नी
1त्या दिवसात जेव्हा इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हा असे झाले की कोणी लेवी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या सर्वांत दूरच्या भागात राहत होता आणि त्याने आपल्याला यहूदातील बेथलेहेम नगरातील एक स्त्री उपपत्नी करून घेतली होती. 2परंतु त्याच्या उपपत्नीने त्यास सोडून व्यभिचार केला, आणि ती त्यास सोडून यहूदातील बेथलेहेमात आपल्या वडिलाच्या घरी परत गेली, आणि तेथे चार महिने राहिली. 3तेव्हा तिचा पती उठून तिचे मन वळवून तिला माघारी आणावे म्हणून गेला. त्याच्याबरोबर त्याचा नोकर होता व गाढवांची जोडी होती, तेव्हा तिने त्यास आपल्या वडिलाच्या घरात नेले, आणि त्या मुलीच्या वडिलाने त्यास पाहिले, त्यास भेटून तो आनंदित झाला. 4त्याच्या सासऱ्याने म्हणजे त्या मुलीच्या वडिलाने त्यास फार आग्रह केला; म्हणून तो त्याच्याकडे तीन दिवस राहिला, आणि तो खाऊन पिऊन तेथे वस्तीस राहिला. 5मग चौथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जायला तयार झाला, परंतु त्या मुलीच्या वडिलाने आपल्या जावयाला म्हटले, “तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.” 6त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले; नंतर त्या मुलीच्या वडिलाने म्हटले, “कृपा करून तू अजून एक रात्र राहायला तयार हो, आणि चांगली वेळ घालव.” 7जेव्हा लेवी जायला उठला, तेव्हा तरुण मुलीच्या वडिलाने त्यास पुन्हा राहण्याचा आग्रह केला, म्हणून त्याने त्याची जाण्याची योजना बदलली आणि पुन्हा तेथे रात्र घालवली. 8नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, “परंतु त्या मुलीच्या वडिलाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब.” तेव्हा त्या दोघांनी जेवण केले. 9जेव्हा लेवी, त्याची उपपत्नी व त्याचा नोकर जायला उठले, तेव्हा त्याचा सासरा त्यास बोलला, “आता पाहा मावळतीकडे दिवस उतरला आहे, तुम्ही आज रात्री येथेच राहा; पाहा, दिवस थोडाच राहिला आहे, येथे वस्ती करून तुमच्या मनाला उल्ल्हास होवो; मग सकाळी उठून आपल्या मार्गाने आपल्या घरी जा.” 10परंतु लेवी ती रात्र घालवायला तयार झाला नाही. तो उठला आणि निघून गेला, मग यबूस म्हणजे यरूशलेमेच्या जवळ आला; तेव्हा त्याच्याबरोबर खोगीर घातलेल्या गाढवांची जोडी, आणि त्याची उपपत्नी होती. 11जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू.” 12त्याचा धनी त्यास म्हणाला, “जे इस्राएलाचे लोक नाहीत अशा परक्यांच्या नगरात आम्ही वळणार नाही; तर गिबा तेथवर जाऊ.” 13लेवीने आपल्या नोकराला सांगितले, “चल, आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यामध्ये रात्र घालवू.” 14मग ते पुढे चालत गेले; आणि बन्यामिनाचा प्रदेश जो गिबा त्याच्याकडे आल्यावर सूर्य मावळला. 15तेव्हा गिब्यात वस्ती करायला ते तिकडे वळले, नंतर तो जाऊन नगराच्या चौकात बसला, परंतु त्यांना रात्री रहावयास कोणी आपल्या घरी घेऊन गेला नाही. 16परंतु पाहा, संध्याकाळी एक म्हातारा मनुष्य शेतातून आपल्या कामावरून येत होता; तोसुद्धा मनुष्य एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातला होता, परंतु गिब्यात उपरा होता आणि त्या ठिकाणातली माणसे बन्यामिनी होती. 17त्याने तर आपली दृष्टी लावून नगराच्या चौकात तो वाटसरू मनुष्य पाहिला; तेव्हा तो म्हातारा मनुष्य म्हणाला, “तू कोठे जात आहेस? तू कोठून आला आहेस?” 18तेव्हा तो त्यास म्हणाला, “आम्ही यहूदाच्या बेथलेहेमाहून आलो आहोत, आणि आम्हांला एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशाच्या पलीकडच्या बाजूस जायचे आहे; तेथला मी आहे; यहूदातील बेथलेहेम येथे गेलो होतो, आणि मला परमेश्वर देवाच्या मंदिराकडे जावयाचे आहे; परंतु कोणी मला त्यांच्या घरात घेत नाही. 19आमच्या गाढवांसाठी वैरण व दाणाही आहे, आणि माझ्यासाठी व तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर व द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.” 20तेव्हा त्या म्हाताऱ्या मनुष्याने त्यास अभिवादन केले, “तुझ्याबरोबर शांती असो! मी तुझ्या सर्व गरजांची काळजी घेईन. फक्त चौकात रात्र घालवू नको.” 21तेव्हा त्या मनुष्याने लेवीला आपल्या घरी नेले, आणि गाढवास वैरण दिली, नंतर त्यांनी आपले पाय धुऊन खाणेपिणे केले. 22ते आनंदात वेळ घालवत असताना, त्या नगरातले दुष्ट लोक, “घराला वेढून आणि दारावर ठोकून, त्या म्हाताऱ्या घरधन्याला म्हणू लागले की, जो मनुष्य तुझ्या घरात आला आहे, त्यास तू बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर समागम करू.” 23मग तो मनुष्य, त्या घराचा धनी बाहेर त्यांच्याजवळ जाऊन त्यांना बोलला, “नाही, माझ्या भावांनो मी विनंती करतो अशी वाईट गोष्ट करू नका; हा मनुष्य माझ्या घरी पाहुणा म्हणून आला आहे, तर तुम्ही हा दुष्टपणा करू नका. 24पाहा, माझी कुमारी कन्या व याची उपपत्नी येथे आहेत. मी तिला आता बाहेर आणतो; मग तुम्ही तिची अब्रू घ्या व तुम्हाला जे बरे वाटते तसे तुम्ही तिच्याशी करा; परंतु या मनुष्याशी असे दुष्टाईचे कृत्य करू नका.” 25तथापि ती माणसे त्याचे ऐकायला तयार झाली नाहीत; तेव्हा त्या मनुष्याने आपली उपपत्नी घेऊन आणि बाहेर त्यांच्याजवळ आणली. मग त्यांनी तिच्यासोबत कुकर्म केले आणि सारी रात्र वाईट रीतीने वागवले आणि पहाट झाली असता तिला सोडले. 26तेव्हा पहाटेच्या वेळेस ती स्त्री येऊन जेथे आपला धनी होता, त्या मनुष्याच्या घराच्या दाराजवळ उजेड होईपर्यंत पडून राहिली. 27जेव्हा सकाळी तिच्या धन्याने उठून घराची दारे उघडली, आणि आपल्या मार्गाने जायला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती त्याची उपपत्नी घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंबरठ्यावर होते. 28तेव्हा लेवीने तिला म्हटले, “ऊठ, म्हणजे आपण जाऊ.” परंतु तिने उत्तर दिले नाही; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणी गेला. 29मग आपल्या घरी पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले. 30ज्या प्रत्येकाने ते पाहिले, त्यांनी म्हटले, “मिसर देशातून इस्राएल लोक पुन्हा आले, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारखी गोष्ट घडली नाही, आणि कधी दृष्टीस पडली नाही; याविषयी तुम्ही विचार करा! आम्हांला सल्ला द्या! काय करावे ते आम्हांला सांगा!”

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in