YouVersion Logo
Search Icon

योहा. 7

7
येशू आणि त्याचे बंधू
1यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही. 2यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता. 3म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. 4जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” 5कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. 6त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे. 7जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत. 8तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.” 9असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.
10पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला. 11तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?” 12आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.” 13तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे.
14मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला. 15तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?” 16त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. 17जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल. 18जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही. 19मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?” 20लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?” 21येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. 22मोशेने तुम्हास सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे.) आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुंता करता. 23मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? 24तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
25यावरुन यरूशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना? 26पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळले आहे काय? 27तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.” 28यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही. 29मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” 30यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. 31तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
32लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले. 33यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. 34तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.” 35यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय? 36हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ हे म्हणणे काय आहे?”
37मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 39ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
40लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.” 41कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? 42दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?” 43यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली. 44त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत.
45मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?” 46कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” 47तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय? 48अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? 49पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” 50पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला. 51“एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” 52त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.” 53मग ते सर्वजण आपआपल्या घरी गेले.

Currently Selected:

योहा. 7: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in