YouVersion Logo
Search Icon

यहो. 2

2
यरीहो येथे दोन हेर पाठवले जातात
इब्री. 11:31
1नंतर नूनाचा पुत्र यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले, त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषतः यरीहो शहर हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. 2मग कोणी यरीहोच्या राजाला सांगितले की, “काही इस्राएल लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” 3तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.”
4त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, “पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. 5अंधार पडल्यावर वेशीचा दरवाजा लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले, ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे तुम्ही कदाचित त्यांना पकडू शकाल.”
6पण तिने तर त्या मनुष्यांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यामध्ये लपवून ठेवले होते. 7त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले.
8इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती त्यांच्याकडे धाब्यावर गेली, 9ती म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हांला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाश्यांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला माहीत आहे.
10कारण तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटविले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोऱ्यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. 11हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
12मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या, 13तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.”
14तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्हीही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही, तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”
15तेव्हा तिने त्यांना खिडकीतून दोराने खाली उतरले, कारण तिचे घर गावकुसास लागून होते. 16तिने त्यांना सांगितले होते की, “तुमचा पाठलाग करणाऱ्यांनी तुम्हाला गाठू नये म्हणून तुम्ही डोंगराकडे जा आणि तेथे तीन दिवस लपून राहा, तोपर्यंत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा.” 17ते पुरुष तिला म्हणाले, “तू आमच्याकडून जी शपथ घेतली आहे तिच्याबाबतीत आम्हांला दोष न लागो.
18मात्र आम्ही ह्या देशात येऊ तेव्हा ज्या खिडकीतून तू आम्हांला उतरविले, तिला हा किरमिजी दोर बांध आणि या घरात तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचे सबंध घराणे तुझ्याजवळ एकत्र कर. 19कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.
20जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकडून जी शपथ तू घेतली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ.” 21ती म्हणाली, “तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल.” ह्याप्रमाणे त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिने किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला.
22ते जाऊन डोंगरास पोहचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परत माघारी जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांचा पाठलाग करणाऱ्यांनी वाटेत चहूकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत.
23मग ते दोघे पुरुष डोंगरावरून उतरून नूनाचा पुत्र यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेले सगळे वर्तमान त्यांनी त्यास सांगितले. 24ते यहोशवाला म्हणाले, “खरोखर हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती दिला आहे, आपल्या भीतीमुळे या देशाचे सर्व रहिवाशी गळून गेल्यासारखे झाले आहेत.”

Currently Selected:

यहो. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in