YouVersion Logo
Search Icon

लूक 2

2
येशूचा जन्म
मत्त. 1:18-25
1त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी. 2ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता. 3प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले.
4मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. 5व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. 6आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, 7तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
8त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. 9अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले. 10देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. 11दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. 12तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.
13मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
14“परम उंचामध्ये देवाला गौरव
आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी
तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
15मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या. 16तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले. 17जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले. 18मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. 19परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. 20नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
21आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
परमेश्वराच्या भवनात येशूचे समर्पण
22पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. 23म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. 24आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
शिमोन व त्याचे स्तोत्र
25तेव्हा पाहा, यरूशलेम त शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. 26आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते. 27आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले, 28तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले,
29“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस.
30कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
31ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.
32ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
33त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. 34आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.
35यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल.
संदेष्टी हन्ना
36तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. 37ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे. 38तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
येशूचे बाळपण
39जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर, ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले. 40बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
41प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरूशलेम शहरास जात. 42जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले. 43मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते. 44तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. 45जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला. 46असे घडले की, तीन दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला, तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता. 47ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. 48जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” 49येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?” 50परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. 51मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.
52येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.

Currently Selected:

लूक 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in