YouVersion Logo
Search Icon

लूक 5

5
पहिल्या शिष्यांस पाचारण
मत्त. 4:18-22; मार्क 1:16-20
1मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, 2तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. 3त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. 4त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” 5शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” 6मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली 7तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. 8हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.” 9कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. 10तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.” 11मग तारवे किनाऱ्याला लावल्यावर त्यांनी सर्वकाही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
कुष्ठरोग्यास बरे करणे
मत्त. 8:1-4; मार्क 1:40-45
12आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” 13तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. 14मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” 15परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले. 16परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे.
17असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत व यरूशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे. 18काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. 19परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. 20त्यांचा विश्वास पाहून, येशू म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहेत.” 21नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” 22पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? 23तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? 24पण तुम्हास हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” 25ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला. 26ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले, ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.
लेवीला पाचारण
मत्त. 9:9-13; मार्क 2:13-17
27या गोष्टी झाल्यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्यास म्हणाला, “माझ्यामागे ये!” 28तेव्हा लेवीने सर्वकाही तेथेच सोडले आणि उठून त्याच्यामागे गेला.
29नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली आणि जकातदारांचा व इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. 30परंतु परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता? 31येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे. 32मी नीतिमानास बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.”
उपासविषयी प्रश्न
मत्त. 9:14-17; मार्क 2:18-22
33ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. 34येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? 35पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील.” 36त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही. 37आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या द्राक्षरसाच्या कातडी पिशवीत ठेवत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. 38नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. 39कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर त्यांना नवा नको असतो कारण तो म्हणतो, जुना द्राक्षरसच चांगला आहे.”

Currently Selected:

लूक 5: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in