YouVersion Logo
Search Icon

मत्त. 17

17
येशूचे रूपांतर
मार्क 9:1-13; लूक 9:9-27-30; 2 पेत्र. 1:16-18
1मग सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना एका उंच डोंगरावर एकांती नेले. 2तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. 3तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. 4पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 5तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.” 6येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते. 7तेव्हा येशूजवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” 8मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.
9नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.” 10मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलीया अगोदर आला पाहिजे?” 11तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलीया येऊन सर्वकाही निटनेटके करील हे खरे, 12पण मी तुम्हास सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्यास ओळखले नाही, पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्यास केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.” 13तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे. हे शिष्यांच्या ध्यानात आले.
भूतग्रस्त मुलाला बरे करणे
मार्क 9:14-29; लूक 9:37-42
14नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15“प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. 16मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना.” 17येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.” 18येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.
19नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हास ते का काढता आले नाही?” 20तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.” 21तरीही प्रार्थना व उपवास यावाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.
आपल्या मृत्युबद्दल येशूने दुसऱ्यांदा केलेले भविष्य
मार्क 9:30-32; लूक 9:43-45
22जेव्हा ते एकत्र गालील प्रांतात आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती धरून दिला जाणार आहे. 23ते त्यास जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दुःखी झाले.
परमेश्वराच्या भवनाचा कर
24येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा परमेश्वराच्या भवनाचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचे गुरू कर देत नाहीत काय?” 25त्याने म्हटले, “होय देतो.” मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्या अगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?” 26जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.” तेव्हा येशूने त्यास म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. 27तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”

Currently Selected:

मत्त. 17: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in