YouVersion Logo
Search Icon

मत्त. 22

22
लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत
लूक 14:15-24
1येशू त्यांच्याशी पुन्हा एकदा दाखल्यांनी बोलला, त्यास उत्तर देऊन म्हणाला, 2“स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. 3त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. 4नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले, राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या. 5चाकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी चाकरांकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला. 6काहीनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले. 7राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठवले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले. 8मग राजा त्याच्या चाकरांना म्हणाला, मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलावले होते ते लायक नव्हते, 9म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. 10मग ते चाकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्याठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे चाकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांस जमा केले आणि लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरून गेला.
11 मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. 12राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना. 13तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. 14कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.”
कैसराला कर देण्याविषयीचा प्रश्न
मार्क 12:13-17; लूक 20:20-26
15मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्यास शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. 16परूश्यांनी त्यांचे शिष्य हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की आपण खरे आहात आणि तुम्ही देवाचा मार्ग खरेपणाने शिकवता व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही आणि तुम्ही लोकांमध्ये पक्षपात दाखवत नाही. 17म्हणून तुमचे मत आम्हास सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” 18येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात? 19कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. 20तेव्हा येशूने विचारले, “या नाण्यावर कोणाचे चित्र आणि नाव लिहिलेले आहे?” 21त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.” 22येशू जे म्हणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
पुनरुत्थानाविषयीचा प्रश्न
मार्क 12:18-27; लूक 20:27-40
23पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, 24ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. 25आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. 26असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. 27शेवटी ती स्त्री मरण पावली. 28आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.”
29येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. 30तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. 31तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? 32ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे,’ तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.” 33जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले.
सर्वात मोठया आज्ञेविषयी प्रश्न
मार्क 12:28-34; लूक 10:25-28
34येशूने सदूकी लोकांस निरूत्तर केले. असे ऐकून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली. 35एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. 36त्याने विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” 37येशूने उत्तर दिले, “‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’ 38ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. 39हिच्यासारखी दुसरी एक आहे ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ 40सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
मसीहाविषयी प्रश्न
41म्हणून परूशी एकत्र जमले असताना, येशूने त्यांना प्रश्न केला. 42येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
43त्यावर येशू त्यांना म्हणाला, “तर दावीद देवाच्या आत्म्याद्वारे, त्याला प्रभू असे कसे म्हणतो? तो म्हणतो,
44 ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की,
“मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत,
माझ्या उजव्या बाजूला बैस.”
45 आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? 46तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्यास उत्तर देता येईना आणि त्या दिवसानंतर त्यास आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.

Currently Selected:

मत्त. 22: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in