YouVersion Logo
Search Icon

मीखा 4

4
परमेश्वराचे सियोनेतील शांतीचे राज्य
यश. 2:2-4
1परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की,
परमेश्वराच्या घराचा पर्वत,
इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल.
आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.
2पुष्कळ देश त्याच्याकडे जातील व म्हणतील,
“या, आपण परमेश्वराच्या पर्वतावर,
याकोबाच्या देवाच्या घराकडे जाऊ या.
मग तो त्याचे मार्ग आपल्याला शिकवील,
आणि आपण त्याच्या मार्गांचे अनुसरण करू.”
कारण सियोनमधून नियमशास्त्र आणि यरूशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.
3तेव्हा पुष्कळ लोकांच्यामध्ये तो न्याय करील,
आणि तो दूरच्या राष्ट्रांविषयी निर्णय ठरवील.
ते आपल्या तलवारी मोडून ठोकून त्यांचे नांगर बनवतील,
आणि आपल्या भाल्यांचे कोयते करतील.
राष्ट्र राष्ट्रांविरुद्ध तलवार उचलणार नाही,
आणि त्यांना युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
4त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली
आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल.
त्यांना कोणीही घाबरवणार नाही.
कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.
5कारण सर्व लोक,
प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात.
पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.
इस्त्राएलाची बंदिवासातून सुटका
6परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसात, मी लंगड्यांना एकत्र करीन,
आणि जे बहिष्कृत व ज्यांना मी पीडले,
त्यांना मी एकवट करीन.
7मी लंगड्यांना शेष म्हणून ठेवीन,
आणि दूर घालवलेल्यांचे बलशाली राष्ट्र करीन.”
आणि आता व सदासर्वकाळ,
मी परमेश्वर सियोन पर्वतावरून त्यांच्यावर राज्य करीन.
8आणि तू, कळपासाठीच्या बुरूजा,
सियोन कन्येच्या टेकड्या,
तुझे पूर्वीचे राज्य तुला परत येईल.
यरूशलेमेच्या कन्येचे राज्य तुला प्राप्त होईल.
9आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस?
काय तुझ्यात राजा नाही?
काय तुझा सल्लागर नष्ट झाला आहे?
कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या कळा तुला लागल्या आहेत.
10सियोनच्या कन्ये, प्रसवतीप्रमाणे वेदना पावून प्रसुत हो,
कारण आता तू शहरातून बाहेर जाशील,
शेतात राहशील,
आणि बाबेलला जाशील. तेथे तुझी सुटका होईल,
आणि परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंच्या हातातून सोडवील.
11आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत.
ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो;
आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.”
12संदेष्टा म्हणतो, त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत,
आणि त्यांना त्याच्या योजना समजत नाहीत.
कारण जशा पेंढ्या खळ्यात गोळा करतात तसे परमेश्वराने त्यांना गोळा केले आहे.
13परमेश्वर म्हणतो, “सियोनेच्या कन्ये, ऊठ आणि मळणी कर,
मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर करीन.
तू पुष्कळ लोकांचा चुराडा करशील.
मी त्यांची संपत्ती परमेश्वरास आणि त्यांचे धन जगाच्या प्रभूला समर्पित करीन.”

Currently Selected:

मीखा 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in