YouVersion Logo
Search Icon

मार्क 11

11
यरूशलेम शहरात येशूचा जयोत्सवाने प्रवेश
मत्त. 21:1-11; लूक 19:28-40; योहा. 12:12-19
1जेव्हा ते यरूशलेम शहराजवळ जैतुनांच्या डोंगराजवळ बेथफगे व बेथानी गावाजवळ आले तेव्हा येशूने आपल्या दोन शिष्यास असे सांगून पाठवले की, 2“समोरच्या गावात जा, गावात जाताच ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा. 3आणि जर कोणी तुम्हास विचारले, ‘तुम्ही हे का घेऊन जात आहात?’ तर तुम्ही असे म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे.’ व तो ते लगेच परत तेथे पाठवील.” 4मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले. 5तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?” 6त्यांनी येशू त्यांना काय म्हणाला ते त्यांना सांगितले. तेव्हा त्या लोकांनी त्यास ते शिंगरु नेऊ दिले. 7त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. 8पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या.
9पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले,
“होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
10आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो.
स्वर्गात होसान्ना.”
11नंतर येशूने यरूशलेम शहरात प्रवेश केल्यावर तो परमेश्वराच्या भवनात गेला व सभोवतालचे सर्व पाहिले. त्या सुमारास संध्याकाळ झाली होती म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
अंजिराचे निष्फळ झाड
मत्त. 21:18-19
12दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली. 13त्यास पानांनी भरलेले अंजिराचे एक झाड दुरून दिसले. त्यावर काही मिळेल या आशेने तो पाहावयास गेला पण तेथे त्यास पानांशिवाय काही आढळले नाही कारण तो अंजिराचा हंगाम नव्हता. 14नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले.
परमेश्वराच्या भवनाचे शुद्धीकरण
मत्त. 21:12-17; लूक 19:45-48; योहा. 2:13-22
15नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली. 16त्याने कोणालाही कसल्याच वस्तूंची परमेश्वराच्या भवनामधून नेआण करू दिली नाही.
17मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला,
“माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाभवन म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय?
परंतु तुम्ही त्यास लुटारूंची गुहा बनवली आहे.”
18मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्यास ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्यास भीत होते.
19त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
विश्वासाचे सामर्थ्य
मत्त. 21:20-22
20सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. 21पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”
22येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. 23मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. 24म्हणून मी तुम्हास सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल. 25जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा. यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. 26परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
येशूच्या अधिकाराविषयीचे प्रश्न
मत्त. 21:23-27; लूक 20:1-8
27ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. 28आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?” 29येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हास एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हास सांगेन. 30योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.” 31त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही? 32परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता. 33मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हास माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हास सांगत नाही.”

Currently Selected:

मार्क 11: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in