YouVersion Logo
Search Icon

मार्क 15

15
रोमन सुभेदार पिलातासमोर येशू
मत्त. 27:1-2; 27:11-14; लूक 23:1-5; योहा. 18:28-38
1पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले. 2पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.” 3मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले. 4मग पिलाताने त्यास पुन्हा प्रश्न विचारला, तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते कितीतरी गोष्टींविषयी तुझ्यावर आरोप करत आहेत! 5पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.
6वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्यास पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे. 7बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. त्याने दंगलीमध्ये खून केल्याबद्दल त्यास पकडण्यात आले होते. 8लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले. 9पिलाताने विचारले, तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? 10पिलात असे म्हणाला कारण त्यास माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते. 11परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांस चिथवले. 12परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? 13ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 14पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! 15पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
शिपाई येशूची थट्टा करतात
मत्त. 27:27-31
16शिपायांनी येशूला राज्यपालाच्या वाड्यात, प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलावली. 17त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा घातला व काटयाचा मुकुट करून त्यास घातला. 18ते त्यास मुजरा करू लागले आणि म्हणू लागले, यहूद्यांच्या राजाचा जयजयकार असो. 19त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यास वंदन केले. 20त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले.
येशूला वधस्तंभावर खिळतात
21वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
22आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले. 23त्यांनी त्यास बोळ मिसळलेला द्राक्षरस दिला परंतु त्याने तो घेतला नाही. 24त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. 25त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास#सकाळचे नऊ झाला होता. 26आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता.
27-28त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.
29जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, अरे! परमेश्वराचे भवन पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना! 30वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःला वाचव. 31तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही! 32या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
येशूचा मृत्यू
मत्त. 27:45-56; लूक 23:44-49; योहा. 19:28-30
33दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. 34मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” 35जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. 36एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू. 37मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला.
38तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
39येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.
40तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या. 41येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या.
येशूची उत्तरक्रिया
मत्त. 27:57-61; लूक 23:50-56; योहा. 19:38-42
42त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता. 43योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 44येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलावले आणि त्यांना विचारले. येशूला मरून बराच वेळ झाला की काय? 45सेनाधिकाऱ्याकडून ते कळाल्यावर, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले. 46मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला. 47येशूला कोठे ठेवले हे मग्दालीया नगराची मरीया आणि याकोब व योसेफ यांची आई मरीया पाहत होत्या.

Currently Selected:

मार्क 15: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in