YouVersion Logo
Search Icon

मार्क 2

2
येशू एका पक्षघाती मनुष्यास बरे करतो
मत्त. 9:2-8; लूक 5:17-26
1काही दिवसानी येशू कफर्णहूम नगरास परत आला तेव्हा तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. 2तेव्हा इतके लोक जमले की घरात त्यांना जागा उरली नाही, एवढेच नव्हे तर दरवाजाबाहेरदेखील जागा नव्हती. तेव्हा तो त्यांना वचन सांगत होता. 3मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. 4परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. 5त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” 6तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, 7“हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” 8आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? 9तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे?” 10परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला, 11“मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.” 12मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”
लेवीला पाचारण
मत्त. 9:9-13; लूक 5:27-32
13येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक त्याच्याजवळ आले आणि त्याने त्यांना शिक्षण दिले. 14नंतर तो जात असता त्याने अल्फीचा मुलगा लेवी यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, “माझ्यामागे ये.” तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला.
15नंतर असे झाले की येशू लेवीच्या घरी जेवायला बसला; तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते कारण ते पुष्कळ असून त्याच्यामागे आले होते. 16तेव्हा काही नियमशास्त्राचे शिक्षक जे परूशी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यांना म्हणाले, “हा पापी व जकातदार यांच्याबरोबर का जेवतो?” 17हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमान लोकांस नाही, तर पाप्यांना बोलावण्यास आलो आहे.”
उपवासाविषयीचा प्रश्न
मत्त. 9:14-17; लूक 5:33-39
18जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?” 19येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही. 20परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवसांत उपवास करतील. 21कोणी नव्या कापडाचा तुकडा जुन्या कापडाला जोडीत नाही, जर तो असे करतो तर नवे कापड जुन्या कापडाला फाडील व छिद्र मोठे होईल. 22तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फोडील आणि द्राक्षरस नासेल व द्राक्षरसाची कातडी पिशवी यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच घालतात.”
23नंतर असे झाले की, येशू शब्बाथ#विश्रांती, विसाव्याचा दिवस दिवशी शेतातून जात असता, त्याचे शिष्य कणसे मोडू लागले. 24तेव्हा परूशी येशूला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी जे करू नये ते हे का करतात?” 25येशू त्यांना म्हणाला, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांस भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते. तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही वाचले नाही काय? 26अब्याथार महायाजक असताना, तो देवाच्या भवनात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी, ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कशा दिल्या, याविषयी तुम्ही वाचले नाही काय?” 27तो त्यास सांगत होता, “शब्बाथ मनुष्यांसाठी करण्यात आला. मनुष्य शब्बाथासाठी करण्यात आला नाही. 28म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा देखील प्रभू आहे.”

Currently Selected:

मार्क 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for मार्क 2