YouVersion Logo
Search Icon

नीति. 14

14
1सुज्ञ स्त्री आपले घर बांधते,
पण मूर्ख स्त्री आपल्या स्वतःच्या हाताने ते खाली पाडते.
2जो सरळपणे चालतो तो परमेश्वराचे भय धरतो,
पण जो कोणी आपल्या मार्गात अप्रामाणिक आहे तो त्यास तुच्छ मानतो.
3मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते,
पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.
4गुरेढोरे नसले तर गोठा स्वच्छ राहतो,
पण बैलाच्या बलाने विपुल पिक येऊ शकते.
5विश्वासू साक्षीदार खोटे बोलत नाही,
पण खोटा साक्षीदार मुखाने लबाड्या करतो.
6निंदक ज्ञानाचा शोध करतो आणि काहीच मिळत नाही,
पण जो कोणी बुद्धिमान आहे त्यास ज्ञान मिळवणे सोपे आहे.
7मूर्ख मनुष्यापासून दूर जा,
कारण त्याच्या वाणीत तुला काही ज्ञान सापडणार नाही.
8शहाण्याने आपले मार्ग समजणे यामध्ये त्याची सुज्ञता आहे,
परंतु मूर्खाचे मूर्खपण कपट आहे.
9मूर्खाला पापार्पणाचे अर्पण थट्टा वाटते,
पण सरळांमध्ये परस्पर कृपा असते.
10हृदयाला आपल्या स्वतःच्या खेदाची जाणीव असते,
आणि त्याच्या आनंदात परक्याला भाग नाही.
11दुष्टाच्या घराचा नाश होईल,
पण सरळांच्या तंबूची भरभराट होईल.
12मनुष्यास एक मार्ग बरोबर आहे असे वाटते,
पण त्याचा शेवट फक्त मरणाकडे नेतो.
13हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात,
आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.
14जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल,
पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.
15भोळा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतो,
पण शहाणा मनुष्य आपल्या पावलांविषयी विचार करतो.
16शहाणा मनुष्य भय धरतो आणि वाईटापासून दूर राहतो,
पण मूर्ख धिटाईने इशारा विचारात घेत नाही.
17शीघ्रकोपी मूर्खासारख्या गोष्टी करतो,
आणि जो वाईट योजना करतो त्या मनुष्याचा द्वेष होतो.
18भोळ्यांना मूर्खपणाचे वतन मिळते,
पण शहाणे ज्ञानाने वेढलेले असतात.
19दुर्जन सज्जनापुढे नमतात,
आणि नीतिमानाच्या दारापुढे दुष्ट नमतील.
20गरीब मनुष्याचे स्वतःचे सोबतीसुद्धा द्वेष करतात,
पण श्रीमंताला खूप मित्र असतात.
21जो कोणी आपल्या शेजाऱ्याचा तिरस्कार करतो तो पापी आहे,
परंतु जो कोणी गरीबावर दया दाखवतो तो आनंदी आहे.
22जो दुष्ट योजना आखतो तो चुकीच्या मार्गाने जात नाही का?
पण जो कोणी चांगले करण्याची योजना करतो, तो कराराचा विश्वास आणि विश्वसनियता स्वीकारतो.
23सर्व कष्टात फायदा आहे,
पण जेव्हा तेथे फक्त बोलतच राहिलात, ते दारिद्र्याकडे घेऊन जाईल.
24शहाण्याची संपत्ती त्याचा मुकुट आहे,
पण मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच आणते.
25खरा साक्षी जीव वाचवतो,
पण खोटा साक्षीदार लबाड्या करतो तो दगलबाज आहे.
26परमेश्वराच्या भयात दृढ विश्वास आहे,
आणि त्याच्या मुलांसाठी ती आश्रयस्थान आहेत.
27परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे,
याकरिता त्यांनी मरणाच्या जाळ्यापासून दूर रहावे.
28प्रजावृद्धित राजाचे गौरव सापडते,
पण प्रजेशिवाय राजपुत्राचा नाश आहे.
29सहनशील मनुष्य खूप समजदार असतो,
पण शीघ्रकोपी मूर्खता उंचावतो.
30शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे,
पण मत्सराने हाडे कुजतात.
31जो मनुष्य गरीबांवर जुलूम करतो तो त्याच्या निर्माणकर्त्याला शाप देतो,
परंतु जो गरजवंतावर दया करतो तो त्याचा सन्मान करतो.
32दुष्ट आपल्या वाईट कृतीने खाली आणला जातो,
पण नीतिमानाला मरणाच्या वेळेसही आश्रय मिळतो.
33बुद्धिमानाच्या अंतःकरणात ज्ञान स्थिर असते,
पण मूर्खाच्या अंतर्यामात जे असते ते कळून येते.
34योग्य ते केल्याने राष्ट्राची उन्नती होते,
पण पाप लोकांस कलंक आहे.
35शहाणपणाने वागणाऱ्या सेवकावर राजाची मर्जी असते,
पण जो लज्जास्पद कृत्य करतो त्याच्यासाठी त्याचा राग आहे.

Currently Selected:

नीति. 14: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in