YouVersion Logo
Search Icon

नीति. 4

4
ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे
1मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका,
आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
2मी तुम्हास चांगला सल्ला देतो;
माझी शिकवण कधीही विसरु नका.
3जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो,
माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
4त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले,
“तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो;
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
5ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर;
माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
6ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील;
त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
7ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर,
आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
8ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल,
जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
9ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल;
ते तुला सुंदर मुकुट देईल.”
10माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे,
आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
11मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे;
मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
12जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही.
आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस.
13शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको;
ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
14दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको,
आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.
15ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस;
त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा.
16कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही
आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
17कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात
आणि हिंसेचे मद्य पितात.
18परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे;
मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.
19पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत,
ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
20माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे.
माझे सांगणे ऐक.
21ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस;
ती तुझ्या अंतःकरणात ठेव.
22कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात,
आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.
23तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,
कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
24वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव,
आणि दूषित बोलणे सोडून दे.
25तुझे डोळे नीट समोर पाहोत,
आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
26तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर;
मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
27तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको;
तू आपला पाय वाईटापासून राख.

Currently Selected:

नीति. 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in