YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 38

38
पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना
आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र.
1परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस,
आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस.
2कारण तुझे बाण मला छेदतात,
आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे.
3माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे.
आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही.
4कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे.
ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे.
5माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे,
माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत.
6मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते;
दिवसभर मी शोक करतो.
7कारण लज्जेने मला गाठले आहे,
आणि माझे सर्व शरीर आजारी आहे.
8मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे.
आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो.
9हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस,
आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही.
10माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे
आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे.
11माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात,
माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात.
12जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात.
जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक
आणि कपटाचे शब्द बोलतात.
13मी तर बहिर्‍यासारखा होऊन ऐकत नाही;
मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही.
14ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे,
ज्याच्याकडे काही उत्तर नाही.
15परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन.
प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
16कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील.
जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील.
17कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे,
आणि मी सतत यातनेत आहे.
18मी माझा अपराध कबूल करतो;
मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे.
19परंतु माझे शत्रू असंख्य आहेत;
जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत.
20माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात.
जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात.
21हे परमेश्वरा, मला सोडू नकोस;
माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
22हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या,
माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in