YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 51

51
शुद्धतेसाठी प्रार्थना
मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे.
1हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर,
तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक.
2देवा माझे अपराध धुऊन टाक,
आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.
3कारण माझे अपराध मला माहित आहेत.
आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत.
4तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे,
आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो.
तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
5पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे,
आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो,
तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
7मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर,
मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8आनंद व हर्ष मला ऐकू दे,
म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9माझ्या पापांकडे बघू नकोस,
माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर.
आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
11तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस,
आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे,
आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन
आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
14हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर,
आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15प्रभू, माझे ओठ उघड,
आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16कारण यज्ञाची आवड तुला नाही,
नाहीतर मी ते दिले असते,
होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय,
तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर.
आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
19तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील.
तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in