YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 9

9
देवाच्या न्याय्यत्वाबद्दल उपकारस्तुती
प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
1मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन;
मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
2तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन,
हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
3माझे शत्रू माघारी फिरतात,
तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
4कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे.
तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
5आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस;
तू दुष्टाचा नाश केला आहेस.
तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
6जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले,
तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे.
त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
7परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे;
त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
8तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार,
राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
9परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे,
संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
10जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात.
कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
11सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
12कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे.
तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
13परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
14म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन;
सियोन कन्येच्या दाराजवळ
मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
15राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत;
त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
16परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
17दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल,
जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल.
18कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही.
किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
19हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो;
राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
20परमेश्वरा त्यांना भयभीत कर;
राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in