YouVersion Logo
Search Icon

प्रक. 12

12
स्त्री व अजगर
1आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. 2ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.
3आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. 4त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. 5आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. 6आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
7आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. 8पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. 9तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
10आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला;
त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य
आणि राज्य आले आहे.
आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत;
कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर
रात्रंदिवस आरोप करीत असे,
तो खाली टाकण्यात आला आहे.
11त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे.
आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
12म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी
आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे,
कारण सैतान खाली तुमच्याकडे
मोठ्या रागाने आला आहे.
कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.
13आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. 14परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल. 15आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. 16पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली. 17तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; 18आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.

Currently Selected:

प्रक. 12: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रक. 12