YouVersion Logo
Search Icon

प्रक. 19

19
स्वर्गात जयोत्सव व कोकऱ्याचे लग्न
1या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली
हालेलूया,
तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,
2कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत;
कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे.
आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.
3आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले,
हालेलूया
तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.
4तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः
आमेन; हालेलूया.
5आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः
तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे,
आपल्या देवाची स्तुती करा.
6आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली,
हालेलूया;
कारण, आमचा प्रभू
सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे.
7या, आपण आनंद करू, हर्ष करू,
आणि त्यास गौरव देऊ;
कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे,
आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
8आणि तिला नेसायला,
स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.)
9आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.” 10आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”
विजयशाली ख्रिस्त
11तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो, 12त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. 13त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे; 14आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. 15आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील. 16त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.
त्याच्या शत्रुंचा नाश
17आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा; 18म्हणजे तुम्ही राजांचे सेनापतीचे मांस खाल आणि बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे आणि त्यावर बसणाऱ्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस खाल.
19आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या. 20मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले; 21बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणाऱ्या तलवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.

Currently Selected:

प्रक. 19: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in