YouVersion Logo
Search Icon

प्रक. 2

2
इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
1 “इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही:
जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत 2तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले. 3मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस. 4तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. 5म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन. 6पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. 7आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
स्मुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
8 स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:
जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो 9मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत. 10जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा मुकुट जे आनंत जीवन आहे ते देईन.
11 पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.
पर्गम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
12 पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:
ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस. 14पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत. 15त्याचप्रमाणे निकलाइतांची शिकवण आचरणारे सुद्धा काहीजण तुमच्यामध्ये आहेत. 16म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तलवारीने त्यांच्याशी लढेन.
17 पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय्य भोजन म्हणजे मान्न्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल, ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.
थुवतीरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र
18 थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही:
ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र हे सांगत आहे, 19मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे. 20परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहेः ईजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता. 21मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही. 22पाहा, म्हणून मी तिला अंथरूणावर खिळून टाकीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचार करतात ते जर आपल्या कामांचा पश्चात्ताप करणार नाहीत तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन. 23तर मी तिच्या अनुयायीरूपी मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे. मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन. 24पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्यास सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात, त्या गोष्टी ज्यांना माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही. 25मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्यास बळकटपणे धरून राहा.
26 जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो,
त्यास मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
27 आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात
तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.
28 जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मीसुद्धा त्यास देईल. मी त्यास पहाटेचा तारा देईन. 29आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.

Currently Selected:

प्रक. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for प्रक. 2