प्रक. 21
21
नवे आकाश व नवी पृथ्वी
1आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. 2आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती; 3आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील 4तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.” 5तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.” 6आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. 7जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल. 8पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”
स्वर्गीय यरूशलेम
9मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकऱ्याची नवरी दाखवतो.” 10तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली. 11यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा वेशी होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे होती, 13पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या. 14आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.
15आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता. 16ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या. 17आणि त्याने तटाचे माप घेतले ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले; 18तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती. 19आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चौथा पाचू, 20पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग. 21आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.
22आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. 23आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे, 24राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील. 25तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र होणारच नाही. 26त्या राष्ट्रांकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील; 27तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.
Currently Selected:
प्रक. 21: IRVMar
Highlight
Share
Copy

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.