YouVersion Logo
Search Icon

प्रक. 9

9
1मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. 2त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. 3त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती. 4यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा. 5त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती. 6त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल. 7टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते. 8त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. 9त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता; 10त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. 11अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे.
12पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
13मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली. 14ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड. 15तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले. 16घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली. 17त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. 18त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला, 19कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात. 20त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही 21आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.

Currently Selected:

प्रक. 9: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in