YouVersion Logo
Search Icon

रोम. 7

7
विवाहावरून केलेले बोध
1बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्‍यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? 2कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. 3म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही. 4आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे. 5कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या. 6पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
नियमशास्त्र व पाप
7मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता. 8पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. 9कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. 10आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले. 11पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले. 12म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे. 13मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.
मनुष्याच्या दैहिक व आध्यात्मिक भावनांचा लढा
14कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे. 15कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. 16मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. 17मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. 18कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही. 19कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. 20मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. 21मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. 22कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो; 23पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. 24मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील? 25मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

Currently Selected:

रोम. 7: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for रोम. 7