YouVersion Logo
Search Icon

तीत. 3

3
ख्रिस्तशिष्याला साजेसे वर्तन व त्याचा पाया
1त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे. 2कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे. 3कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो; 4पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली, 5तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनिकरणाने तारले. 6आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला. 7म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
8हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यांसाठी हितकारक आहेत. 9पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. 10तुमच्यामध्ये फुट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव. 11तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो.
नमस्कार
12मी अंर्तमाला किंवा तुखिकला तुझ्याकडे धाडून दिल्यावर, तू माझ्याकडे निकापलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर कारण मी तेथे हिवाळा घालविण्याचे ठरवले आहे. 13जेना शास्त्री व अपुल्लो ह्यांना काही उणे पडणार नाही अशाप्रकारे पोहोचते कर. 14आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
15माझ्याबरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात. जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.

Currently Selected:

तीत. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in