YouVersion Logo
Search Icon

1 करिंथ 1

1
शुभेच्छा व आभार
1करिंथ येथील देवाच्या ख्रिस्तमंडळीला, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यासाठी बोलावलेल्या लोकांना आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांना,
2देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:
3देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांची कृपा व शांती तुम्हांला लाभो.
4ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाचे सर्वदा आभार मानतो; 5-6कारण जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढ झाली, तसतसे तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत, अगदी बोलण्यात व ज्ञानातदेखील, संपन्न झालात. 7परिणामी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे तुम्ही कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत. 8आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच तुम्हांला शेवटपर्यत दृढ राखील. 9ज्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याबरोबरच्या सहभागात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
ख्रिस्तमंडळीतील गटबाजीला विरोध
10बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हां सर्वांचे बोलणे ऐक्याचे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये. तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले असावे. 11कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत, असे मला “लोवेच्या कुटुंबातील काही माणसांकडून कळले आहे. 12माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा”, “मी अपुल्लोसचा”, “मी पेत्राचा” आणि “मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे”, असे म्हणतो. 13ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी क्रुसावर चढवले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?
14क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणालाही बाप्तिस्मा मी दिला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. 15नाही तर, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने दिला गेला, असे कोणी म्हणावयाचा! 16आणखी मी स्तेफनच्या घरच्यांनाही बाप्तिस्मा दिला. त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाला बाप्तिस्मा दिला की नाही, हे माझ्या लक्षात नाही. 17ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा देण्यास नव्हे तर शुभवर्तमान घोषित करायला पाठविले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून क्रुसाविषयी वाक्चातुर्याने सांगण्यास मला पाठवले नाही.
क्रुसामध्ये असलेले सामर्थ्य
18कारण ज्यांचा नाश होत आहे, त्यांना क्रुसाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, अशा आपल्यासाठी तो देवाचे सामर्थ्य आहे, कारण 19‘मी ज्ञानवंतांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिवंतांची बुद्धी शून्यवत करीन’, असा धर्मशास्त्रलेख आहे. 20तर मग ज्ञानी कोठे राहिले? धर्मशास्त्र कोठे राहिले? ह्या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे!
21जगाला स्वतःच्या शहाणपणाद्वारे देवाची ओळख पटली नाही. आम्ही केलेली घोषण़ा जगाला मूर्खपणाची वाटली. म्हणून देवाने त्याच्या शहाणपणानुसार ठरवले की, ह्या घोषणेवर जे श्रद्धा ठेवतात त्यांचे तारण व्हावे. 22यहुदी लोक चमत्कारांचा पुरावा मागतात व ग्रीक ज्ञानाचा शोध करतात, 23परंतु आम्ही तर क्रुसावर चढवलेला ख्रिस्त जाहीर करतो. हा संदेश यहुदी लोकांना न आवडणारा व ग्रीक लोकांना मूर्खपणा वाटेल असा आहे खरा, 24मात्र पाचारण झालेल्या यहुदी व ग्रीक अशा दोघांनाही तो संदेश म्हणजे स्वतः ख्रिस्त आहे, तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. 25कारण देवाचा मूर्खपणा, माणसांच्या शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञ आहे आणि देवाची दुर्बलता माणसांच्या शक्तीपेक्षा अधिक बळकट आहे.
26तर बंधुजनहो, तुम्हांला झालेल्या पाचारणाचा विचार करा. तुमच्यामध्ये पुष्कळ जण जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे नाहीत. 27तरी ज्ञानी लोकांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले आणि बलवानांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले 28आणि जगातील ज्या क्षुल्लक, तिरस्करणीय व नगण्य गोष्टी देवाने ह्याच्यासाठी निवडल्या की, जे अस्तित्वात आहे ते त्याने शून्यवत करावे, 29म्हणजे देवासमोर कोणीही बढाई मारू नये. 30तो आपल्यासाठी देवाचे ज्ञान, नीतिमत्त्व, पवित्रीकरण आणि तारण झाला आहे. देवामुळे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. 31म्हणजे ‘जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूविषयी तो बाळगावा’ ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.

Currently Selected:

1 करिंथ 1: MACLBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in